राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने मराठवाडय़ातही प्रथमच ४६ पैकी तब्बल १५ जागा जिंकून बाजी मारली. शिवसेनेला ११, काँग्रेसला ९, तर राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्या. पंकजा मुंडे यांनी परळीचा गड राखला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी देशात विक्रम ठरेल, अशा प्रचंड मतांनी विजय मिळवला.
एमआयएमने औरंगाबाद मध्य मतदारसंघातील जागा जिंकून खाते उघडले. या पक्षाचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास तडा दिला. विनायक पाटील (अहमदपूर, लातूर) व मोहन फड (पाथरी, परभणी) हे दोन अपक्ष विजयी झाले. काँग्रेसचे राजेंद्र दर्डा व राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना पराभवाचा धक्का बसला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएममुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन दर्डा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राष्ट्रवादीचे राजेश टोपे (घनसावंगी, जालना), जयदत्त क्षीरसागर (बीड), काँग्रेसचे अमित देशमुख (लातूर शहर), डी. पी. सावंत (नांदेड उत्तर), मधुकर चव्हाण (तुळजापूर), अब्दुल सत्तार (सिल्लोड, औरंगाबाद) या माजी मंत्र्यांनी मात्र आपापले गड राखले.
मराठवाडय़ातील तब्बल २४ आमदारांना पराभवाचा धक्का बसला. यात काँग्रेस १०, राष्ट्रवादी ८, शिवसेना ५ व अपक्ष सीताराम घनदाट यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्य़ातील ओमप्रकाश पोकर्णा, हनुमंत बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, माधवराव जवळगावकर हे ४ आमदार पराभूत झाले, तर औरंगाबाद जिल्ह्य़ात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, हर्षवर्धन जाधव, आर. एम. वाणी हे तिन्ही आमदार पराभूत झाले. नांदेड दक्षिणमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील यांना फेरमतमोजणीनंतर विजयी घोषित करण्यात आले.
दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात झालेल्या या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत मैदानात उतरले होते. अशा वेळी आपण सर्वात मोठा पक्ष ठरू, असा शिवसेनेला विश्वास होता. परंतु प्रत्यक्षात हा पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. मागील निवडणुकीत काँग्रेस १९, राष्ट्रवादी १४, शिवसेना ९, तर भाजपच्या २ जागा होत्या. मनसेला एक जागा मिळाली होती. मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, लोकसभेच्या रणमैदानात मोदी लाटेवर स्वार होत मराठवाडय़ाने भाजप व शिवसेनेच्या पारडय़ात प्रत्येकी तीन जागा निवडून दिल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपलाच मोठे यश मिळाले.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांच्यासह जालना जिल्ह्य़ात भाजपला तीन जागा मिळाल्या, तर बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नावामागे मतदार उभे राहिल्याचे दिसून आले. जालना मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे कैलास गोरंटय़ाल यांचा पराभव केला.