सटाणा येथील घटना

गेल्या चार वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या सटाणा शहरातील ट्रामा केअर सेंटरचे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने म्हणजे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते उद्घाटन केले. या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना विश्वासात घेतले नाही तसेच कोनशिलेवर त्यांचे नाव चिकटविण्यात आल्याची तक्रार करत उद्घाटन सोहळ्यानंतर दोन तासात भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोनशिलेची तोडफोड केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शहरातील ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्ष झाले. त्यानंतर यंत्रसामग्री आणून व काही पदे भरून हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. गुरूवारी त्याचे अधिकृत उद्घाटन राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना कोणतीही माहिती न देता आरोग्य मंत्र्यांची दिशाभूल करण्यासाठी फलकावर नाव टाकण्यात आले तर कोनशिलेवर डॉ. भामरे यांचे नाव चिकटविण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर सायंकाळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सरोज चंद्रात्रे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नीलेश पाकळे यांच्या नेतृत्वाखाली शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी ट्रामा केअर सेंटरवर हल्लाबोल केला. घोषणाबाजी करून उद्घाटनाचा फलक फाडण्यात आला. मूळ कोनशीला उखडून फेकण्यात आली. ट्रामा केअर सेंटरच्या कामाशी राष्ट्रवादीच्या आमदारांचा कोणताही संबंध नाही. भाजपचे माजी आमदार व खासदार यांच्या प्रयत्नामुळे ते काम मार्गी लागले. जनतेची दिशाभूल करण्यासाठी चव्हाण दाम्पत्य श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला.

दरम्यान, उद्घाटन सोहळ्यात डॉ. सावंत यांनी रुग्णांशी सुसंवाद साधतांना आत्मीयता आणि जिभेवर साखर ठेवून धीर दिल्यास अर्धा आजार बरा होतो. मात्र आरोग्य सेवेत व्यावसायिकता आल्याने तो सुसंवाद राहिला नाही, ही चिंतेची बाब असल्याचे नमूद केले. शासनाने आरोग्य खात्यातील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे सात हजार पदे भरता आली. आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात येईल, असे सांगितले.