एका सच्च्या, गरीब, तळमळीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांला डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या आणि अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या टोप्या, बिल्ले, झेंडे इत्यादी प्रचार साहित्य भरचौकात फेकून दिल्याने भाजप पक्षश्रेष्ठींनी अखेर अधिकृत उमेदवारी दिलेल्या उध्दव येरमे यांना माघार घेण्यास भाग पाडले आणि ज्या उमेदवारासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता त्या राजू तोडसाम यांच्या उमेदवारीची घोषणा अर्ज छाननीच्या दिवशी अर्थात सोमवारी केली.    
आर्णी विधानसभा मतदारसंघात कांॅग्रेसचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याविरुध्द भाजपने उध्दव येरमे आणि राजू तोडसाम या दोघांना उमेदवारी अर्ज भरायला लावले. राजू तोडसाम यांचे शेकडो कार्यकत्रे प्रचंड उत्साहात अर्ज दाखल करायला पांढरकवडा येथे निवडणूक अधिकारी कार्यालयात जमले. मात्र, एबी फॉर्मवर पहिले नाव उध्दव येरमे यांचे आणि दुसरे नाव राजू तोडसाम यांचे होते. त्यामुळे राजू तोडसाम यांची उमेदवारी भाजपने कापली, हे स्पष्ट झाल्याने तोडसाम समर्थक कार्यकत्रे इतके संतप्त झाले की, त्यांनी पक्षाच्या टोप्या, बिल्ले, झेंडे इत्यादी प्रचार साहित्य भरचौकात फेकून दिले. या घटनेचे तीव्र पडसाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचले. अखेर उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी उध्दव येरमे यांनी अर्ज मागे घ्यावा, असा आदेश भाजपा खासदार हंसराज अहिर यांनी दिला. त्याप्रमाणे येरमे यांनी माघार घेतली. परिणामत राजू तोडसाम हे आता भाजपचे आर्णी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार झाले आहेत.
या आदिवासी राखीव मतदारसंघात गोंड समाजाचे प्राबल्य आहे. राजू तोडसाम गोंड असून उध्दव येरमे हे परधान समाजाचे आहेत. त्यांनी मोघे यांच्याविरोधात दोनदा लढत देऊन पराभव पाहिला होता. २००४ च्या निवडणुकीत भाजपच्या डॉ.संदीप धुर्वे यांनी कांॅग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांचा साडेचार हजार मतांनी पराभव केला होता. २००९ मध्ये भाजपने उत्तम इंगळे यांना मोघेंच्या विरोधात लढवले. त्यावेळी मोघे यांनी इंगळे यांचा ४८ हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी भाजपने माजी आमदार डॉ.संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली नाही म्हणून रातोरात त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून मोघे यांच्याविरुध्द धनुष्यबाणाची प्रत्यंचा ओढली आहे, तर भाजपने कार्यकर्त्यांचा तीव्र संताप आणि आक्रोश लक्षात घेऊन उध्दव येरमे यांना माघार घेण्यास भाग पाडून राजू तोडसाम यांचीच उमेदवारी जाहीर केली. प्रस्तुत वार्ताहराने भाजप खासदार हंसराज अहिर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजू डांगे यांच्याशी मंगळवारी संपर्क साधला तेव्हा त्यांनी उध्दव येरमे यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत व येरमे यांनी अर्ज मागे घेतला आहे, असे स्पष्ट केले. राजू तोडसाम हे आता भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचेही खासदार हंसराज अहिर व राजू डांगे यांनी सांगितले.
‘फॉरवर्ड ब्लॉक’ बाद, ‘सपा’ झिरो
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर निवडणूक लढण्याची घोषणा करणाऱ्या फॉरवर्ड ब्लॉकने जिल्ह्य़ातील सातपकी केवळ यवतमाळ मतदारसंघात मोतीराम महादेव सिंग यांना उमेदवारी दिली होती. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद ठरल्यामुळे फॉरवर्ड ब्लॉकचा कोणीही उमेदवार यवतमाळ जिल्ह्य़ात नाही. उल्लेखनीय म्हणजे, समाजवादी पक्षाचा आणि मोहंमद ओवेसी यांच्या एमएमआर या पक्षाचाही उमेदवार यवतमाळ जिल्ह्य़ातील सातपकी एकाही मतदारसंघात नाही. शेतकरी कामगार पक्षाने दिलीप मुक्कावार यांना यवतमाळातून उमेदवारी दिली आहे, तर बसपाने पुसदमध्ये शिलानंद कांबळे, दिग्रसमध्ये विनायक भोयर, यवतमाळात मोहंमद तारीक, राळेगावात सुरेश मेश्राम आणि वणीत राहुल खापर्डे यांना उमेदवारी दिली आहे.