माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस सुशासनदिन म्हणून साजरा करताना भाजपच्या वतीने लातूर शहरात स्वच्छता अभियानाचा देखावा करण्यात आला. हे अभियान जणूकाही फोटोसाठीच राबवले जात असल्याचे वातावरण गुरुवारी सकाळी दिसून आले.
भाजपच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी ९ वाजता स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात १०.४५ वाजता अभियानाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी खा. डॉ. सुनील गायकवाड, प्रा. विजय क्षीरसागर, शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, मोहन माने, प्रवीण सावंत, स्मिता परचुरे, मीना कुलकर्णी, सुधीर धुत्तेकर, आदींसह सुमारे सव्वाशेपेक्षा अधिक कार्यकत्रे होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक िशदेही याप्रसंगी उपस्थित होते. महापालिकेचे कर्मचारीही अभियानप्रसंगी सज्ज होते. १२ खोरे, १२ झाडू व १२ टोपल्या, अशी ‘जय्यत’ तयारी. महाविद्यालयाच्या परिसरात सुमारे तासभर साफसफाई सुरू होती. कार्यकर्त्यांची संख्या अधिक व साहित्य कमी त्यामुळे प्रत्येक जण फोटो काढून घेण्यात मग्न होता. फोटोग्राफरची संख्या कमी असल्यामुळे मोबाइलवरून फोटो काढण्यातच कार्यकत्रे मग्न असल्याचे चित्र दिसत होते.
भाजपच्या प्रांत कार्यालयातून कार्यकर्त्यांसाठी ‘सशक्त भारत, समर्थ भाजप’ लिहिलेले टी शर्ट, टोप्या, गमछे, बिल्ले आलेले होते. नाकातोंडात धूळ जाऊ नये, यासाठी मास्कही होते. फक्त सर्व साहित्यानिशी आपला फोटो कसा चांगला येईल व तो प्रांत कार्यालयात पाठवण्याचा वापर करण्यासाठीची धडपड सुरू होती. पूर्वी असे कार्यक्रम काँग्रेस पक्षाचे होत असत. आता भाजप सत्तेत असल्यामुळे ती जागा भाजपने घेतली आहे. तासाभराच्या स्वच्छता अभियानातून सुमारे दोन वाहनांत कचरा टाकण्यात आला व कार्यकत्रे पांगले.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वच्छतेसाठी विविध स्वयंसेवी संस्थेने कायमस्वरूपी काही भाग दत्तक म्हणून घेतला आहे. त्यासाठी नियमित वेळ देणारे लोकही आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ही अपेक्षा स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने होती, मात्र देखावा करण्यातच कार्यकत्रे मग्न असल्याचे चित्र दिसून आले.