एकेकाळचा बालेकिल्ला ढासळला; दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काँग्रेसची पीछेहाट

कोणे एकेकाळी दगड उभा केला तरी विजय काँग्रेसचा हे समीकरण ठरलेले होते. सांगली म्हणजे पत्री सरकारचे जनक क्रांतीसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा जिल्हा. काँग्रेसचे पूर्णपणे वर्चस्व. अगदी राज्याच्या स्थापनेपासून अगदी कालपर्यंत म्हणजे २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सांगलीत काँग्रेस उमेदवाराचा कधी पराभव झाला नव्हता. अशा या सांगलीत काँग्रेसची पीछेहाट होऊन भाजपचे कमळ फुलू लागले आहे. काँग्रेससाठी हा धोक्याचा इशारा आहे.

East Nagpur, Congress, booth planning,
पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
BJP test, Congress, West Nagpur,
काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत
mla raju awale marathi news, sangli congress marathi news
सांगलीतील नाराजीचा हातकणंगलेत परिणाम नाही; ‘मविआ’च्या नेत्यांचा निर्वाळा

वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील आदी मातब्बर नेत्यांचा राजकीय वारसा लाभलेल्या सांगली जिल्ह्य़ात काँग्रेसचा पूर्ण पगडा होता. वसंतदादांनी ज्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा विजय निश्चित असायचा. विरोधकांनी केवळ नुरा कुस्तीचाच खेळ सांगलीच्या कसदार मातीत खेळला. जिल्हा परिषद, पंचायत समिती असो वा नगरपालिका नंतर महापालिका काँग्रेसच्या विचारांचीच सत्ता कायम राहिली होती.

काँग्रेसच्याच राजकारणावर िपड पोसलेल्या मंडळींनी सांगलीचा नावलौकिक देशपातळीवर गाजवला. पत्री सरकारचे क्रांतीसिंह नाना पाटील याच जिल्ह्य़ातील. वसंतदादा पाटील यांचे दिल्लीदरबारी प्रस्थ होते. सध्या भाजपचे आमदार असलेले शिवाजीराव नाईक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. पंचायत राज पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी केली म्हणून प्रथम क्रमांकही या जिल्हा परिषदेने राष्ट्रीय पातळीवर पटकावला होता. आता हा इतिहास झाला असला तरी भविष्याच्या स्वप्नांची इमारत याच इतिहासाच्या मुळावर उभी केली जाते हे विसरून चालणार नाही.

आज भाजपची वाढलेली ताकद म्हणजे सूज आहे असा समज काहींनी केला असला तरी या सूज येण्याला कोण कारणीभूत याची मीमांसा करण्याची गरज वाटत नाही. जिल्ह्य़ात खासदार, तीन आमदार यापाठोपाठ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भाजपकडे गेले आहे. घराला आग लागल्यावर बघत बसणार काय? असा सवाल करून राजकीय संन्यासाची वस्त्रे खुंटीला टांगून धावून जाणारे वसंतदादा कुठे अन् अध्र्या हळकुंडावर राज्याच्या नेतृत्वाची स्वप्ने पाहणारे सध्याचे वारसदार कुठे? असा प्रश्न साहजिकच मनात आल्याविना राहत नाही.

कुरघोडीचे राजकारण

वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील राजकीय मतभेद जरी ताणले गेले तरी या नेत्यांनी कधी पक्षाच्या मुळावर घाव घातला नाही. दादांचे राजारामबापूंचे मतभेद टोकाला गेले, दोघांनीही वेगळ्या चुली मांडल्या तरी काँग्रेसची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र गेल्या वीस वर्षांच्या काळात विशेषत: राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कुरघोडीच्या राजकारणात एकमेकांना अडविण्याची जिरविण्याची खुमखुमी बळावली. दादांनी पाणी अडवा, पाणी जिरवा ही घोषणा दिली, मात्र वारसा सांगणाऱ्यांनी ‘माणसं आडवा, माणसं जिरवा’ असा याचा अर्थ प्रत्यक्षात अमलात आणला. आजही हाच वारसा परंपरा म्हणून तिसरी पिढी जोपासत आहे.

वाळव्यात आमदार जयंत पाटील यांची ताकद वाढणार नाही याची दक्षता सोनसळच्या कदम बंधूंकडून घेतली जाते. यासाठी कधी महाडिक गटाला तर कधी नायकवडी गटाला मदत केली जाते. याला काटशह म्हणून पलूस-कडेगावमध्ये कदमांची नाकेबंदी करण्यासाठी जयंत पाटील कडेपूरच्या देशमुख वाडय़ाला कृष्णेचे पाणी पुरवितात. विटय़ात सदाभाऊ पाटील यांची ताकद वाढू नये यासाठी अनिल बाबर यांना सोनसळची मदत दिली जाते, तर जतमध्ये जगतापांची ताकद वाढू नये यासाठी विक्रम सावंतसारख्या पपाहुण्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न होतो. याला शह देण्याचा प्रयत्न जयंत पाटील हे करत आले आहेत, मग त्याला कधी दुष्काळी फोरमचे नाव असो अथवा आज जी भाजपची कमळे उमलली आहेत ती ताकद असो, यामागे एकमेकांना अडवा-अडवीच कारणीभूत ठरली आहे.

आजच्या घडीला शिराळ्यात अर्धी सत्ता काँग्रेसची आहे, तर महापालिकेत सत्ता काँग्रेसची असली तरी तिचा टेकू राष्ट्रवादीचा आहे. कारण सत्ताधारी काँग्रेसमध्येच दुफळी निर्माण झाली आहे. दादा घराण्याचे आम्हीच वारसदार म्हणून सांगणाऱ्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा असे बिरुद मिरविणारा कारखाना कर्जाच्या खाईत बुडविला. वसंतदादा शेतकरी बँक बुडाली. एकही नाव घेण्यासारखा प्रकल्प चालू नाही, मग लोक, कार्यकत्रे जगणार कसे? असा प्रश्न या नेत्यांना कधी पडतच नाही. केवळ आमच्या नावाचा टिळा लावला की लोक मतदान करतात, असा असलेला समज काळाबरोबर कृष्णेच्या प्रवाहात वाहून गेला. काँग्रेसअंतर्गत असलेले मतभेद औदुंबरच्या डोहामध्ये दरवेळी बुडविले जातात. यामुळे मतभेद संपले नसले तरी डोह मात्र काळवंडला आहे. मात्र हे समजून घेण्याची अक्कलही तिसऱ्या पिढीकडे नसावी हेच या काँग्रेसचे दुर्दैव म्हणावे लागेल.

कदम गटाची धुराही तिसऱ्या पिढीकडे गेली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मिरविणारे बाळासाहेब म्हणजेच विश्वजीत कदम केवळ हेलिकॉप्टरने फिरतात, सामान्य माणसाची वेदनाच त्यांना उमजत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली ही मंडळी केवळ सत्ता म्हणजे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असे मानून वागत असल्यानेच पलूस-कडेगावमध्ये भाजपने त्यांना अस्मान दाखविले आहे.

आयात नेत्यांवर लक्ष

  • काँग्रेसचे नेतृत्व युवा पिढीकडे गेले आहे, मात्र ही पिढी आमचा वंशपरंपरागत वारसा आमचाच याच भ्रमात जोपर्यंत वागेल तोपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन पाहण्यास मिळण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. वर्षभरात महापालिकेचे रणमदान सुरू होईल.
  • त्यावेळी काँग्रेसमध्येच एवढे गट उदयास येतील की भाजपला महापालिका जिल्हा परिषदेच्या सत्तेबरोबर आंदण दिली जाईल याची शाश्वती सध्या काँग्रेसकडून मिळत आहे.
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शहकाटशहाचे राजकारण सुरू असतानाच भाजपने मात्र पद्धतशीरपणे जिल्ह्य़ाकडे लक्ष केंद्रित केले आहे. संजयकाका पाटील आणि पृथ्वीराज देशमुख या दोघांना राष्ट्रवादीमधून आयात करून ताकद देण्यात आली. संजयकाका खासदार म्हणून निवडून आले.
  • नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जिल्हाध्यक्ष या नात्याने पृथ्वीराज देशमुखांनी पक्षाला यश मिळवून दिले. भाजपने कार्यकर्ते तयार करण्यावर भर दिला. तालुका पातळीवर गावागावांमध्ये पक्षाने संघटन उभे केले.
  • कार्यकर्त्यांना मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण देऊन तयार केले. भाजपची ताकद वाढत असली तरी काँग्रेस नेते मात्र अजूनही आपल्या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास तयार नाहीत. परिणामी दगड उभा केला तरी निवडून येणार अशी परिस्थिती असलेल्या काँग्रेसचा आता एकेका जागेसाठी घाम निघू लागला आहे.