गेल्या वर्षभराच्या काळात राज्यावर ओढवलेली नैसर्गिक संकटे पाहून भाजपचा सत्तेत येण्याचा मुहूर्त चुकल्यासारखे वाटते, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ते रविवारी अमरावतीतील वरूड येथील संत्री आणि कृषी प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. गेल्याचवर्षी राज्यावर दुष्काळ आणि गारपीटीचे संकट ओढवले होते. त्यानंतर पुढील वर्ष सुरळीत जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतरही नैसर्गिक संकटांची ही मालिका सुरूच राहिली. यंदाही अनेक जिल्ह्यांत कमी पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमचे सरकार कोणत्या मुहूर्तावर सत्तेवर आले, असा प्रश्न आम्हाला पडल्याचे गडकरींनी सांगितले.
ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, गारपीट वगैरे संकटांना शेतकऱ्यांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडू नये. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. आपण या संकटावर मात करू”, असा विश्वासही गडकरींनी यावेळी व्यक्त केला.