आमदार पराग अळवणी यांनी रत्नागिरीतून आलेल्या विस्तारकांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, रत्नागिरीचे नगरसेवक तथा शहर सरचिटणीस उमेश कुळकर्णी आणि जिल्हा उपाध्यक्ष सोनुभाऊ कळंबटे हे तिघेजण चिपळूण शहरात विस्तारक म्हणून काम करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रशांत शिरगावकर उपस्थित होते.

यासंदर्भात नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी सांगितले, केंद्रामध्ये मोदी सरकारला तीन वष्रे पूर्ण होत आहेत. तसेच पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त विस्तारक योजना राबवली जात आहे. केंद्र, राज्य शासनाच्या अनेकविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.

चिपळूण शहरामध्ये ३३ बूथ आहेत. प्रत्येकी ११ बूथची जबाबदारी आमच्यावर देण्यात आली आहे. भाजपाच्या वाढीसाठी बूथ समिती नेमणे, भीम अॅप तसेच केंद्र, राज्य सरकारच्या योजना आम्ही जनतेपर्यंत पोचवणार आहोत.

मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत अनेक लोकाभिमुख योजना हाती घेतल्या. वस्तू व सेवा कर, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासन, अधिकारांचे विकेंद्रीकरण, एलइडी दिव्यांची क्रांती, कालबाह्य झालेले १८२४ कायदे निश्चित करून त्यातील ११७५ कायदे रद्द केले आहेत. हृदयविकारग्रस्तांसाठी लाखो रुपयांच्या स्टेंटची किंमत ३० हजार रुपयांवर आणली. व्हिआयपी संस्कृतीची संपवण्यासाठी सरकारी गाड्यांवरील लाल दिवा काढला. भरघोस आíथक विकास, स्वच्छ रेल्वे, गतिमान रेल्वे, गावांना रस्ते व वीज, जनधन योजना, गरिबांना सामाजिक सुरक्षा, पंतप्रधान पीक विमा योजना, मृदापत्रिका, उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, युवकांसाठी कौशल्यविकास, वन रँक वन पेन्शन, स्वच्छ भारत अभियान अशा विविध योजना  केंद्र सरकारने सुरू केल्या. या योजनांची माहिती ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांना मिळाली पाहिजे या हेतूने विस्तारक घरोघरी पोहोचणार आहेत.

तसेच पं. दीनदयाळ उपाध्याय यांची माहितीसुद्धा या अभियानात दिली जाणार आहे. भविष्यात भाजपची ताकद आणखी वाढण्यासाठी या अभियानाचा उपयोग होणार आहे.