सुधीर दिवे आणि दादाराव केचे वादात नितीन गडकरी यांची मध्यस्थी

देशाला ‘अच्छे दिन’ आले अथवा नाही, हा वादाचा विषय होईल. पण, भाजपचे ‘अच्छे दिन’ झळाळत असल्याबद्दल दुमत नसल्याचे पक्षातील वाढत्या चुरशीमुळे म्हटले जाते. नेत्यांची गटबाजी वाढल्यास एकास संघटना तर दुसऱ्यास दिल्ली दरबारी सेवा, असा तोडगा भाजपच्या श्रेष्ठींनी काढला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खास विश्वासू सुधीर दिवे व माजी आमदार दादाराव केचे यांच्यातील स्पध्रेपोटी उफाळलेल्या जाहीर वादामुळे श्रेष्ठींना थेट केंद्रीय मंत्रालयाचा आधार घेत वाद शमवावा लागला.

Yavatmal, mandap Collapses, Four Injured, Preparation, PM Modi, Meeting,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी निर्माणाधीन मंडप कोसळला, चार जण जखमी
Supriya Sule pune
लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही – सुप्रिया सुळे
farmers demand to call parliament session
संसदेचे अधिवेशन बोलवा! किमान आधारभूत किंमतीच्या कायद्यासाठी शेतकऱ्यांची मागणी
farmer protest
शेतकर्‍यांबरोबर चर्चेच्या चौथ्या फेरीत काय ठरले? शेतकऱ्यांसाठी केंद्राची पंचवार्षिक योजना काय आहे?

केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नव्या बदलात जलसंधारण खाते आले. गडकरी यांचे विशेष अधिकारी (ओएसटी) म्हणून दोन दिवसांपूर्वीच सुधीर दिवेंना जलसंधारण खात्यात नियुक्ती मिळाली आहे. केवळ प्रदेश कार्यकारिणी सदस्य असणाऱ्या दिवेंचा परिचय भाजप नेते असा नाहीच, तर गडकरींच्या खास वर्तुळातील कारभारी असा दिला जातो. तेसुद्धा गडकरीच आपले विश्व असल्याचे सागंतात. केंद्रीय पातळीवर त्यांना अशी मोठी बढती मिळण्यामागे त्यांची राजकीय उडी कारणीभूत ठरली. गत दोन वर्षांपासून दिवे आर्वी विधानसभा मतदारसंघात पिंगा घालत आहेत. रक्तदान, आरोग्य व अन्य शिबिरे तसेच कार्यक्रमांचा त्यांनी सपाटा लावला. त्यामागचे कारणही लपून नव्हते. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीचे ते दावेदार समजत. गडकरींचे विश्वासू म्हणून त्यांना काही स्थानिक भाजप नेत्यांची साथ मिळाली. त्यामुळे या मतदारसंघाचे माजी आमदार दादाराव केचे यांचा तिळपापड उडाला. वर्षांनुवर्षांपासून या क्षेत्रात भाजपचे ‘सिंचनक्षेत्र’ विस्तारण्याचे श्रेय मिळणाऱ्या केचेंना वृद्धाश्रमात पाठविण्याची तयारी झाल्याचे मत संघ वर्तुळातील चमूच्या अहवालाचा दाखला देत पुढे आले होते. काँग्रेसच्या आमदार अमर काळेंच्या ७० हजारांच्या मतपेढीस केचे हे जिंकले किंवा हरले तरी कमी करू शकण्यास असमर्थ ठरत असल्याचा युक्तिवाद होता. शिवाय गतवेळी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या वेळी केचे आपला जि.प. गट घेऊन अज्ञातवासात गेले होते. गडकरींच्या हस्तक्षेपानंतर ते प्रकटले. अन्य दोन प्रसंगांत त्यांनी पक्षापेक्षा मोठा असल्याचा आविर्भाव दाखविण्याचाही आरोप होता.

गटबाजीमुळे सोलापूर भाजपला मुख्यमंत्र्यांची धोक्याची घंटा?

पुढे केचे जाणार व दिवे येणार अशी चर्चा सुरू झाली. रोहण्यातील एका कार्यक्रमात केचेंचा संताप अनावर झाला. दिवेंच्याच उपस्थितीत त्यांनी त्यांचे नाव न घेता नको त्या शब्दात संताप मांडला. कोण कुठचे येतात, वगैरे शब्दातील केचेंचे आक्रंदन गटबाजीस पेटवून गेले. पुढे आर्वी व त्यानंतर नागपुरात केचे-दिवे जुंपली. वादाच्या कहर झाल्यानंतर केचेंनी गडकरींची भेट घेतली. साहेब मी तुमचाच. तुम्ही बस म्हटले तर बसेन, ऊठ म्हटले तर उठेन. मी राजकीय संन्यास घ्यायचा का, असा टोकदार सवाल केचेंनी टाकल्याचे सांगतात. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून गडकरींनी जिल्ह्य़ातील एका ‘वजनदार’ नेत्यास पाचारण करीत तोडग्यावर चर्चा केली. तूर्तास दिवेंना दिल्लीत घ्या, लोकसभा आटोपल्यावर बघू, असा तोडगा निघाला. दिवे दिल्लीत गेले.

सत्तावर्तुळात वावरल्याने दिवेंचे फावलेपण त्यांना राजकीय उडी घेण्यास बाध्य करत गेले. त्यातच केचेंवर वक्रदृष्टी दिसताच दिवेंनी लांब उडी, उंच उडी सुरू केली. केचे-दिवे हे गडकरी अनुयायी म्हणून अग्रभागी असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तुळातील एक निकटस्थ चर्चेत आहेच. पण पडद्याआड वावरणारा हा ‘मन का मित’ आर्वीवर वरचष्मा राखून आहे, असा पक्षीय वाद बहुस्तरीय सत्ता भाजपकडे असल्यानेच वारंवार प्रकटतो. सत्तेमुळेच शमतोही. गटबाजीला कुंपण घालण्याचे काम थेट केंद्रीय मंत्रालयाचा आधार घेत झाल्यानेच हे उदाहरण अनेकांच्या आशा उंचावून गेले आहे.

गडकरी यांनी विश्वास दाखविला..

नव्या जबाबदारीबद्दल सुधीर दिवे म्हणाले, मी दिल्लीतील जलसंधारण खात्यात काम सुरू केले आहे. एक-दोन दिवसांत अधिकृतपणे पदभार सांभाळेन. ही देशपातळीवरील जबाबदारी माझ्यावर टाकून गडकरी यांनी मोठा विश्वास टाकला आहे. देशपातळीवरील काम हाताळतानाच मी आर्वी मतदारसंघास सुजलाम करू शकणाऱ्या ऊध्र्व व निम्न वर्धा तसेच कार सिंचन प्रकल्पास गती देण्याचा प्रयत्न करेन. प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर दोन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. हे काम शेतकऱ्यांच्या पुढील पिढीसाठी जीवनदायी ठरणारे आहे. त्यापुढे आर्वीचा आमदार होण्याचे उद्दिष्ट मी दुय्यम मानतो. मी आर्वीकरच आहे. संपर्कात राहणारच, अशी भूमिका मांडणाऱ्या दिवेंनी अप्रत्यक्षपणे ‘आर्वी बंदी’ अमान्य केली. वेळेवरचा पाहुणा अशी केचे समर्थक दिवेंची हेटाळणी करतात. तर भूमिपुत्र असणाऱ्या दिवेंनी कर्तृत्वापोटी गाव सोडल्याने ते परके नसल्याचा दावा त्यांचे स्थानिक मित्र करतात. आर्वी तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) येथील दिवेंचे शिक्षण आर्वी शहरात झाले. शासकीय सेवेत असताना दिवे यांचे गडकरी यांच्याशी जुळले. पूर्ती (मानस) उद्योग समूहाचा कारभार यशस्वी करून दाखविल्यानंतर ते गडकरी परिवाराच्या गळ्यातील ताईत बनले. गटाच्या साखर कारखान्याची तेच जबाबदारी पाहतात. गडकरींची दोन्ही मुले उद्योग सांभाळण्यास समर्थ झाल्यावर दिवेंना मोकळीक मिळाली.