नारायण राणेंविषयी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झालेली नसून ते आमच्या नेत्यांच्या संपर्कातही नाहीत, असे स्पष्टीकरण भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिले आहे. नारायण राणेंसाठी मी मंत्रिपद सोडणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असेही ते म्हणालेत.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे नारायण राणे भाजपत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. नारायण राणेंनी दसऱ्यानंतर भावी वाटचालीची घोषण करु असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे. दुसरीकडे पुण्यात एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाविषयी भाष्य केले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नारायण राणेंविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्या पक्षातील कोणताही नेता राणेंच्या संपर्कात नाही, असा दावाही त्यांनी केला. राणे भाजपमध्ये येणार असले तरी याबाबत मुख्यमंत्री आणि अमित शहा चर्चा करतील आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच अंतिम निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. नारायण राणेंसाठी मंत्रिपद सोडणार या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असा दावाही त्यांनी केला आहे.

ऑगस्टमध्ये सावंतवाडी येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी राणेंविषयी विधान केले होते. नारायण राणे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही, पण राज्याचा कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री भाजपत प्रवेश करत असेल तर त्याचे स्वागतच आहे असे त्यांनी म्हटले होते. पक्षासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचा त्याग करण्यास तयार असल्याचे सूचक वक्तव्यही पाटील यांनी केले होते.