अवकाळी मुसळधार पावसाने ग्रामीण भाग सुन्न झालेला असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना गावागावात जाऊन धूलिवंदन साजरी करण्याचा सल्ला दिल्याने खासदार चांगलेच पेचात पडले आहेत.
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या सांसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीला संबोधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना होळीसाठी गावी गेल्यावर धूलिवंदन साजरी करण्याची सूचना केली. ही सूचना देशभरातील भाजप खासदारांना होती. मात्र, याच दरम्यान महाराष्ट्र, उत्तरप्रदेशसह देशातील विविध भागात अवकाळी पावसाने थमान घातले. शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याने ग्रामीण भागात सुन्न वातावरण आहे. महाराष्ट्रात तर खरीपही हातून गेल्याने शेतकऱ्यांची रब्बीवर आशा होती. गहू, चना, मका, तसेच फ ळ व फू लशेतीचा काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शेतकऱ्यांना आस होती, पण अवकाळी मुसळधार पावसाने चांगलेच थमान घातले आणि त्यात या शेतीचीही वाताहत झाली. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना सर्वत्र दिसून येते. विदर्भाला तर या पावसाचा चांगलाच तडाखा बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी तर दिलासा देण्यासाठी दौराच केला. या एकूणच स्थितीमुळे ग्रामीण भाग सुन्न झालेला आहे. सणवार तर सोडाच, पण आता दोन वेळची चूल कशी पेटणार, अशी चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मग धुळवळ साजरी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच पाश्र्वभूमीवर भाजपचे खासदार विवंचनेत आहे. धूलिवंदन साजरी करणार की, शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाणार, असा प्रश्न त्यांना पडल्याची पक्षपातळीवरील प्रतिक्रिया आहे.
मात्र, खासदार रामदास तडस यांनी या प्रतिक्रियेचे खंडन करतांना स्पष्ट केले की, पंतप्रधानांनी आम्हाला धूलिवंदन साजरी करण्यास सांगितले, हे खरे आहे. लोकांमध्ये मिसळा, असा त्याचा अर्थ आहे. अर्थसंकल्पावर या निमित्याने चर्चा करा, त्याचे फोयदे त्यांना सांगा, असे त्यांना अभिप्रेत आहे. चुकीचा अर्थ काढू नये, अशी भूमिका खासदार तडस यांनी मांडली.
प्रशांत देशमुख, वर्धा