मराठा आरक्षण सोडा, पण संघाला विचारल्याशिवाय सरकार काहीच करु शकत नाही अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. संघ आरक्षणाविरोधात असल्याने भाजप मागासवर्गीय समाजाला आरक्षण देणार नाही असा आरोपच त्यांनी केला.

विधान परिषदेत गुरुवारी आरक्षणाच्या प्रश्नावरुन चर्चा करण्यात आली. राज्यातील मराठा, धनगर , मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रस्ताव मांडला. यावरील चर्चेदरम्यान मुंडेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मराठा समाजाने राज्यात, देशात आणि विदेशात आदर्श घालून देणारे मोर्चे काढले. आता या समाजाला चर्चा नको, तर आरक्षणावर ठाम निर्णय हवा आहे असे मुंडे म्हणालेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने वेळेत प्रतिज्ञापत्र दाखल केले असते तर आज प्रस्ताव मांडण्याचा उतावीळपणा सरकारला करायची गरज लागली नसती असे मुंडे यांनी सांगितले.

भाषणादरम्यान मुंडेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा तीन वेळा उल्लेख करुन भाजप सरकारला चिमटे काढले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारपेक्षा जास्त न्यायालयीन लढा विनोद पाटील यांनी दिला. तर सरकारने मराठा समाजाचा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेलाही मुंडे यांनी खडेबोल सुनावले आहेत. शिवसेनेने मराठा आरक्षण मोर्चाचा अवमान केला असून त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही असे त्यांनी शिवसेनेला सुनावले. आम्हाला राजकारण करायचे नाही, सत्ताधा-यांनीही ते करु नये, आरक्षणाची प्रामाणिक भुमिका सरकारने स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली.

धनगर समाजाची राज्य सरकारने फसवणूक केली असा आरोपही मुंडे यांनी केला. सत्तेत आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. पण त्यानंतर आता १०० बैठका होऊनही धनगर आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.