पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षांनिमित्त येत्या २६ मे ते १० जूनदरम्यान भारतीय जनता पक्ष राज्यात पक्षविस्तार पंधरवडा साजरा करीत आहे. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर आणि राज्यातील सर्व जागांवर लढविण्याच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून हा ‘पक्ष विस्तारक कार्यक्रम’ असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्य़ातील कार्यविस्तार प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने स्पष्ट झाले.

पंधरवडाभर राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रारंभीचे चार दिवस ग्रामीण भागात ‘शिवार संवाद यात्रा’ आणि त्यानंतर मतदानाचे बूथ पक्षासाठी अधिक अनुकूल करण्याचे प्रयत्न केले जातील. शिवार संवादयात्रेत प्रत्येक पंचायत समिती सदस्याच्या कार्यक्षेत्रात किमान चार सभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर नियुक्त केलेले विस्तारक प्रत्येक बूथवर किमान साडेसातशे सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहेत. नवीन सदस्य जोडताना त्या भागातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची यादी तयार करणे, बूथमधील राजकीय परिस्थितीची माहिती जमा करणे, दहा सदस्यांचा समावेश असलेल्या बूथ समितीची बैठक घेणे, वीस घरांच्या संपर्कासाठी प्रत्येकी एक कार्यकर्ता नेमणे, जाहीरसभा घेणे इत्यादी जबाबदारी विस्तारकावर असेल. विस्तारकाच्या सोबत एक पालकही असेल आणि त्याच्यावरही काही जबाबदाऱ्या असतील. राज्य आणि केंद्र सरकारची कामगिरी चांगली, मध्यम, बरी किंवा खराब यापैकी कशी आहे, याचा अभिप्राय बूथप्रमुख विस्तारक आणि पालक यांच्या स्वाक्षरीने पक्षाकडे सादर करण्यात येणार आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांशी संपर्क करून त्यांचा मेळावा आयोजित करण्याची सूचनाही विस्तारकांना देण्यात आली आहे.

जालना जिल्हा पातळीवर झालेल्या सुमारे तीनशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या ‘केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि शिवार संवाद’ या विषयावरील भाषणाने झाले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामदास अंबटकर यांनी ‘विस्तारक योजना’ या विषयावर तर बुलडाणा येथील मोहन शर्मा यांनी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ विषयावर मनोगत व्यक्त केले. आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती.

प्रशिक्षण वर्गाचा समारोप करताना प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांनी देशात आणि राज्यात पक्षाचा जनाधार सातत्याने कसा वाढत आहे, हे सांगून त्या अनुषंगाने तपशील दिला. दानवे म्हणाले, राज्यातील ९१ हजार मतदार बूथवर एकाच वेळी कार्यविस्ताराचा कार्यक्रम सुरू होणार आहे. पक्षास नवीन लोक जोडण्याचे काम या माध्यमातून होईल. राज्यात पक्ष वाढत असल्याचे अलीकडेच झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. परंतु असे असले तरी गाफील राहण्याऐवजी पक्ष आणखी बळकट करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

संघ कार्यकर्त्यांशी संपर्क

पक्ष विस्तार पंधरवडय़ात बूथ स्तरावर मतदारांशी संपर्क साधताना विस्तारक आणि त्याच्या पालकाने कुणाशी संपर्क साधावा आणि काय माहिती घ्यावी, याचा तपशील प्रदेश भाजपने दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचे विस्तारकांना सांगण्यात आले आहे. त्यासोबतच विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती व्यतिरिक्त विविध जाती, समाज, वस्तीप्रमुख आणि संस्थांमधील व्यक्तींशी संपर्क साधण्यासही विस्तारकांना सांगण्यात आले आहे. शासकीय योजनांचे लाभार्थी, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, सोशल मीडियाचा वापर करणारे युवक इत्यादींशी संपर्क साधण्यात येणार आहे. शासकीय योजना लाभार्थी आढळल्यास त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्याची सूचनाही विस्तारकास करण्यात आली आहे.

मुस्लीम महिलांशी संपर्क

मुस्लीम महिलांशी संपर्क करणे आणि सशक्तीकरण करून त्यांचे मनोबल वाढविणे. तसेच तीन तलाकविषयी चर्चा करणे, असा मुद्दाही कार्यविस्तारक आणि त्यांच्या पालकांना लेखी स्वरूपात देण्यात आला आहे. मागासवर्गीय आयोगाला दिलेले घटनात्मक महत्त्व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त सरकारने घेतलेल्या विविध प्रकल्पांची माहिती तसेच अल्पसंख्यांक आणि मागास वर्गासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही विस्तारकांवर टाकण्यात आली आहे.