राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे दिल्लीत राजकीय भेटीगाठींना जोर आला असतानाच भाजपाध्यक्ष अमित शहा सोमवारी नागपूरमध्ये दाखल झाले. दुपारी अमित शहा हे संघमुख्यालयात पोहोचले असून संध्याकाळी उशीरापर्यंत सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी बंद दाराआड त्यांची चर्चा सुरु आहे.

जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा सोमवारी नागपूरमध्ये पोहोचले. नागपूरमध्ये दाखल झाल्यावर अमित शहा यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील नेत्यांसोबत चर्चा केली. यानंतर दुपारनंतर अमित शहा हे संघ मुख्यालयात दाखल झाले. संघ मुख्यालयात अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि भैय्याजी जोशी या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशासंदर्भात झाली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात ही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा यांच्यापूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर हे सोमवारी सकाळी संघ मुख्यालयात आले होते. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीविषयी त्यांनी संघनेत्यांशी चर्चा केली असावी अशी शक्यता आहे.

दरम्यान, जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते. हिंदूराष्ट्रासाठी मोहन भागवत हे राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे शिवसेनेने म्हटले होते. मोहन भागवत यांनी निवडणूक लढवणार नाही असे सांगितले होते. गेल्या आठवड्यात अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही असे सांगितले होते.