औरंगाबाद जिल्हय़ात शिवसेना व भाजपने प्रत्येकी ३ जागा जिंकल्या. एमआयएम पक्षानेही खाते उघडले. औरंगाबाद मध्यमधून या पक्षाचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला. सेनेच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लागल्याचे चित्र दिसून आले. काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी गड राखला, तर माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांना मात्र एमआयएममुळे आपटी खावी लागली. भाजपच्या अतुल सावे यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विजय मिळविला.
औरंगाबाद मध्य मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून भाजपतर्फे किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी केली होती. त्यांना ४० हजार ८७८ मते मिळाली, तर प्रदीप जैस्वाल यांना ४१ हजार ९७६ मते मिळाली. हिंदू मतांचे विभाजन आणि मुस्लिम समाजाने एमआयएमला केलेल्या एकगठ्ठा मतदानामुळे इम्तियाज जलील यांना ६१ हजार ८३९ मते मिळाली. एमआयएमचा प्रभाव औरंगाबाद पूर्वमध्येही कमालीचा होता. या मतदारसंघात अध्र्या फेऱ्यांची मोजणी पूर्ण होईपर्यंत एमआयएमचे डॉ. गफार कादरी आघाडीवर होते. शेवटच्या फेऱ्यांमध्ये अतुल सावे यांनी ४ हजार २६९ मतांनी विजय मिळविला. गेली तीन टर्म मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून येणाऱ्या दर्डा यांचा या वेळी मोठय़ा फरकाने पराभव झाला. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना २१ हजार २०३ मते मिळाली.
शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिमचा गड ६ हजार ९८७ मतांनी राखला. भाजपच्या मधुकर सावंत यांनी त्यांना चांगली टक्कर दिली. शिरसाट यांना ६१ हजार १९३, तर सावंत यांनी ५४ हजार २०६ मते मिळाली. पैठणमध्येही शिवसेनेने बाजी मारली. राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे यांना २५ हजार ३९ मतांनी शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी पराभूत केले. त्यांना ६६ हजार ९९१ मते मिळाली. फुलंब्रीत काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे यांना भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी पराभूत केले. बागडे यांना ७३ हजार २९४ मते मिळाली, तर कल्याण काळे यांना ६९ हजार ६८३ मते मिळाली. बागडे ३ हजार ६११ मतांनी विजयी झाले. भाजपने गंगापूरची जागा मिळविली. भाजपचे प्रशांत बंब यांनी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा १७ हजार २७८ मतांनी पराभव केला. बंब यांना ५५ हजार ४८३ मते मिळाली, तर दानवे यांना ३८ हजार २०५ मते मिळाली. कन्नडमधील लढत अटीतटीची झाली. शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव विजयी झाले. मात्र, मतांतील अंतर खूपच कमी होते. केवळ १ हजार ४९१ मतांनी त्यांचा विजय झाला. वैजापूरचे सलग तीन वेळा आमदार आर. एम. वाणी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीच्या भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ४ हजार ७०९ मतांनी वाणी यांचा पराभव केला.