राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणे इतर ठिकाणीही शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी भाजपवर थेट निवडणुकीसाठी पैसे वाटत असल्याचा आरोप केला. भाजप जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सर्कलसाठी भाजप प्रत्येकी ४० लाख रूपये वाटत असल्याचे खैरेंनी म्हटले. भाजपकडे एवढा पैसा कुठून आला, याचा खुलासा केला जावा. एवढीच हिंमत असेल तर भाजपने हे पैसे रोखीने न देता चेकने द्यावेत आणि डिजिटल निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान खैरे यांनी दिले. आम्हालाही निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा माहिती आहे. त्यामुळे भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी दिलेले पैसे जाहीर केल्यास आम्हीही हा मुद्दा उचलून धरू, असे खैरे यांनी म्हटले. दरम्यान, खैरे यांच्या या टीकेला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप हा लखपतींचा नव्हे तर लोकपतींचा पक्ष असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

यापूर्वी खैरे यांनी जिल्हा परिषद निवडणूक मेळाव्यात भाजप हाच शिवसेनेचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे म्हटले होते. औरंगाबादमध्ये निवडणूक तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती.या निवडणुकीत शिवसेनेची स्पर्धा आघाडीशी नसून भाजप हाच आमचा मुख्य प्रतिस्पर्धी असल्याचे खैर यांनी म्हटले होते. याशिवाय, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनेही यावरुन भाजपवर पलटवार केला आहे. पारदर्शक व्यवहार फक्त मुंबई महापालिकेतच नव्हे तर राज्य आणि सरकारमध्ये असायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे. नोटाबंदीचा निर्णय हा एकतर्फीच होता. तो निर्णयदेखील पारदर्शकपणे झाला असता तर एवढा गदारोळ झाला नसता असा टोला शिवसेना आमदार अनिल परब यांनी लगावला होता.