नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राज्य पातळीवर अभूतपूर्व यश मिळवले असले तरी कोकणात या पक्षाचे उमेदवार मोठय़ा फरकाने पराभूत झाल्याने पक्षसंघटनेच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून असलेल्या १५ जागांपैकी पनवेल, उरण, गुहागर, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी या सहाच ठिकाणी भाजप उमेदवारांची नोंद घेण्याजोगी कामगिरी झाली. पण त्यांपैकी पनवेल वगळता एकाही ठिकाणी त्यांचा उमेदवार विजय मिळवू शकला नाही. पनवेलमधून निवडून आलेले प्रशांत ठाकूर हेही काँग्रेसमधून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले आणि बऱ्याच अंशी स्वबळावर विजयी झाले. सावंतवाडीत सेनेच्या दीपक केसरकरांना कडवी लढत देत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले एके काळचे राणेसमर्थक राजन तेलीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी भाजपवासी झाले होते. त्यामुळे या दोन्ही जागांचे श्रेय भाजप घेऊ शकत नाही. उरलेल्या चार जागांपैकी उरणमध्ये चांगली लढत दिलेले भाजप उमेदवार महेश बाल्दी चौथ्या क्रमांकावर राहिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला. पण मागच्या निवडणुकीत तो सेनेला देण्यात आल्यामुळे भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी बंडखोरी केल्याचा फायदा उठवत राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी विजय मिळवला आणि त्यानंतर गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात अशा प्रकारे बांधणी केली की, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळूनही डॉ. नातूंना पराभवच स्वीकारावा लागला. भावी काळातही हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपाला खूप परिश्रम करावे लागणार आहेत.
गुहागरप्रमाणेच रत्नागिरी हाही मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल मानला जात असे. १९८० च्या दशकात कै. कुसुम अभ्यंकर आणि त्यानंतर शिवाजीराव गोताड यांच्या माध्यमातून भाजपने येथे भक्कम बांघणी केली होती. १९९९मध्ये तरुण उमेदवार बाळ माने यांनी ती परंपरा पुढे चालवली. पण त्यानंतर गेल्या सलग तीन निवडणुका त्यांना येथे माजी मंत्री उदय सामंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यांपैकी दोन निवडणुका सामंतांनी राष्ट्रवादीच्या, तर यंदा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. यातील गमतीचा भाग म्हणजे २००४ व २००९ मध्ये सेनेबरोबर युती असूनही आणि यंदा युती तुटल्यामुळे सेनेच्याच उमेदवाराकडून मानेंना हे पराभव सहन करावे लागले.  
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर कुलदीप पेडणेकर यांनी सुमारे २२ हजार मते घेतल्यामुळे भाजपचे प्रमोद जठार अवघ्या ३४ मतांनी निवडून आले. पण गेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी आणि पक्षसंघटन करून त्यांना हा मतदारसंघ राखता आला नाही. यंदाच्या निवडणुकीत विरोधी मतांच्या विभाजनाचा लाभ उठवत नितेश राणे यांनी तेथे आरामात विजय मिळवला.
या संदर्भात नोंद घेण्यासारखा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रत्नागिरी आणि कणकवली या दोन्ही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनी प्रचाराची सांगता झाली. पण त्याचाही काही प्रभाव पडला नाही.
रत्नागिरीतून पराभूत झालेले बाळ माने यांनी यापुढे निवडणूक न लढवता पक्षसंघटनासाठी झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कोकणात भाजपची असलेली सध्याची स्थिती लक्षात घेता मानेंना त्या दृष्टीने भरपूर वाव आहे. शिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत त्यांना मुख्य आव्हान सेनेचेच राहणार आहे. अशा परिस्थितीत कोणतेही अंतस्थ हेतू न ठेवता कोकणचे वसंतराव भागवत होण्याची त्यांची मनापासून तयारीआहे का हा खरा प्रश्न आहे.