शिवसेनेबरोबरची युती तुटली नसती, तर भाजपला राज्यातील स्वत:ची ताकद कधीच उमगलीच नसती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते शनिवारी कोल्हापूरमधील भाजपाच्या राज्य अधिवेशनात बोलत होते. विधानसभा निवडणुकांच्यावेळी आम्हाला शिवसेनेबरोबरची युती तोडावी लागेल याची थोडीशीही कल्पना नव्हती. पण परिस्थितीने आम्हाला युती तोडण्यासाठी भाग पाडले. मात्र, त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की, भाजपला राज्यातील स्वत:ची ताकद उमगली. अन्यथा आम्हाला कधीच स्वत:ची ताकद कळाली नसती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधानसभेच्यावेळी फार कमी दिवसांत आमच्यापुढे २८८ जागा लढविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, त्यावेळी अमित शहा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. निवडणुकीतील त्यांच्या चोख व्यवस्थापनामुळे आणि खंबीर भुमिकेमुळेच राज्यातील भाजप कार्यकर्त्यांना बळ मिळाले. त्याच बळावर आम्ही राज्यामध्ये सत्ता आणण्यात यशस्वी ठरल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाषणादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कामगिरीचे कौतूक केले. भाजपने लोकसभा निवडणुकीआधीच शत प्रतिशत बुथची रचना करायचे ठरविले होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि अवघ्या दोन महिन्यांत ५०००० बुथमध्ये भाजपची स्थापना केली. त्यामुळेच भाजपला राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवता आली, असे फडणवीसांनी म्हटले.