नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचेच सरकार सत्तेवर येणार, अशी जोरदार हवा भाजपने निर्माण केली असताना घायकुतीला आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी चक्क मतदान केंद्र बळकावण्यापर्यंत मजल मारली. गोपीनाथ मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातील आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी, १७ एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाजता निवडणूक कर्मचाऱ्यांना धमकावून एक मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी १०जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अटकेतील सर्व हे औरंगाबाद, आष्टी व नगर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. राज्यात मतदान केंद्र बळकाविण्याचा गुन्हा नोंदविला गेलेला हा पहिलाच प्रकार आहे.
या प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नवलकिशोर राम यांनी एक समिती नियुक्त केली असून निवडणुकीदरम्यान घडलेल्या प्रत्येक गुन्ह्य़ाचे नव्याने विश्लेषण केले जाणार आहे. या मतदान केंद्रावर २४ एप्रिल रोजी फेरमतदान घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली आहे.
आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी या पाचशे लोकसंख्या असलेल्या गावातील २१३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर १७ एप्रिलला शांततेत मतदान सुरू होते. सायंकाळी साडेपाच वाजता पक्षांचे प्रतिनिधी मतदान केंद्राबाहेर गेले. त्याचदरम्यान १५ तरुण मतदान केंद्रात घुसले. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून मतदान यंत्र ताब्यात घेत मतदानही केले. याबाबत तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केंद्रातील मतदान यंत्र, झालेले मतदान यांची तपासणी केली. त्यात या मतदान केंद्रावर एकूण ३९५ मतदारांपकी ३०३ मतदारांनी हक्क बजावला असतानाही मतदान यंत्रात ३११ मते नोंदवली गेल्याचे दिसून आले. याबाबत मतदान केंद्रप्रमुख विकास गुणाजी अदमुले यांचा व इतर दोन कर्मचाऱ्यांनी लेखी जबाबात मतदान केंद्र बळकावून मतदान झाल्याचा प्रकार उघड झाला.
दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी १०जणांना अटक केली. अटक झालेल्यांमध्ये आंधळेवाडी येथील सुभाष आंधळे, आजिनाथ आंधळे, बबन आंधळे, बाळू आंधळे, भीमराव आंधळे, विश्वजित आंधळे, संभाजी वनवे, अशोक आंधळे, भाऊसाहेब आंधळे यांचा समावेश आहे. यातील बहुतांश कार्यकर्ते भाजपचे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत डोके यांनी दिली.
सशस्त्र बंदोबस्त नव्हता
परळी आणि आष्टी या दोन मतदारसंघांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे प्रशासनाला वाटत होते. त्यामुळे तेथे अधिक बंदोबस्त होता. आंधळेवाडी हे आडवळणी आणि लहान गाव असल्याने तेथे पोलिसांचा पहारा होता. मात्र सशस्त्र बंदोबस्त नव्हता.