युतीचा काडीमोड झाल्यानंतर उमेदवार शोधताना भाजपच्या नेत्यांची अक्षरश: दमछाक झाली. जिल्ह्यातल्या ९ पकी ७ ठिकाणी निष्ठावंतांना डावलून पक्षाने नव्यानेच दाखल झालेल्या ‘उपऱ्यां’ना उमेदवारी बहाल केली.
नांदेड जिल्ह्यातल्या ९ विधानसभा मतदारसंघांपकी युतीच्या काळात भाजपच्या वाटय़ाला केवळ किनवट व नायगाव हे दोनच मतदारसंघ होते. युतीचा काडीमोड झाल्यानंतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांना उमेदवारांची अक्षरश: शोधाशोध करावी लागली. काही दिवसांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेतला आहे. जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, खतगावकर व डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी जिल्ह्यातल्या उमेदवारांची निवड केली.
नांदेड  दक्षिण मतदारसंघातून चतन्यबापू देशमुख, सुनील वर्मा व अन्य काही निष्ठावंत इच्छुक असताना पक्षाने काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नगरसेवक दिलीप कंदकुत्रे यांना उमेदवारी बहाल केली. नांदेड उत्तरमधून पक्षाकडे अनेक इच्छुक दावेदार असताना शिवसेनेतून शुक्रवारी भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी महापौर सुधाकर पांढरे यांना संधी देण्यात आली. भोकरमधून डॉ. माधवराव किन्हाळकर, काँग्रेसमधून आलेल्या गोिवद राठोड यांना मुखेडमधून, शेकापतून नुकतेच प्रवेश करणाऱ्या मुक्तेश्वर धोंडगे यांना लोहा-कंधारमधून तर शिवसेनेतून प्रवेश करणाऱ्या लता कदम यांना हदगावमधून उमेदवारी देण्यात आली.
नायगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी संभाजी पवार यांचे सुपुत्र राजेश पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अध्र्याहून अधिक आयुष्य संघ तसेच भाजपच्या संघटनात्मक कामात खर्ची घालणारे सुधाकर भोयर किनवटमधून इच्छुक होते. नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार या तिघांनीही भोयर यांना शब्द दिला होता; पण ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या माजी खासदार डी. बी. पाटील यांच्या आग्रहाखातर येथे अशोक सूर्यवंशी यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली.
पक्षाचे निष्ठावंत कार्यकत्रे व संघाचे काम करणाऱ्या अनेकांनी ज्या प्रवृत्तीविरुद्ध आयुष्यभर लढा दिला, अशापकी काहींना उमेदवारी बहाल करत भाजपच्या नेत्यांनी निष्ठावंतांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. पक्षाचे नेते एकनाथराव खडसे हे उमेदवारी देण्यासंदर्भात निष्ठावंतांना न विचारता खतगावकरांशी संपर्क करून पक्षाचे काँग्रेसीकरण करत आहेत, असा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून अरुंधती पुरंदरे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून राम चौधरी यांची उमेदवारी निश्चित केली होती; पण या दोघांनाही ठेंगा मिळाला आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांची उमेदवारी रात्रीपर्यंत निश्चित होती. परंतु काँग्रेसीकरण करण्याच्या उद्योगात मुखेड विधानसभा मतदारसंघातून शिक्षणसम्राट गोिवद राठोड यांना भाजपने उमेदवारी बहाल केली. विशेष बाब म्हणजे गोिवद राठोड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते.