मुनगंटीवार, हंसराज अहिर यांचा आक्रमक प्रचार फळाला

विदर्भातील भाजपची लाट, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लावलेला विकासकामांचा धडाका, मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा अखेरच्या टप्प्यातील आक्रमक प्रचार आणि गटबाजीचा काँग्रेसला बसलेला फटका यातून चंद्रपूरमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

Wardha, sea islands, Shailesh Aggarwal,
वर्धा : समुद्रालगत बेटांवरील मतदारसंघाची जबाबदारी जिल्ह्यातील ‘या’ नेत्याकडे
Jalna Lok Sabha, Raosaheb Danve, Kalyan Kale,
जालन्यात पुन्हा दानवे विरुद्ध काळे सामना रंगणार
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत ६६ पैकी ३६ जागांवर भाजपने यश संपादन केले. काँग्रेसचे निम्म्यापेक्षा अधिक जागांचे नुकसान होऊन केवळ १२ नगरसेवक विजयी झाले. त्यापाठोपाठ बसप ८, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे या तीन पक्षांचे प्रत्येकी २, अपक्ष ३ व प्रहारचा १ नगरसेवक विजयी झाला. हा एकत्रित विजय भाजपचा दिसत असला तरी तो निर्विवादपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या विकासकामांचा आणि मुनगंटीवार-अहिर या दोन मंत्र्यांनी केलेल्या झंझावाती प्रचाराचा तसेच आमदार नाना शामकुळे यांनी दलित समाजामध्ये भाजपप्रती निर्माण केलेल्या विश्वासाचा विजय आहे. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून किंबहुना सहा महिने आधीपासूनच भाजपने अतिशय पद्धतशीरपणे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले होते. त्याचाच भाग म्हणून बाबुपेठ उड्डाणपूल, दाताळा पूल, वैद्यकीय महाविद्यालय, वन अकादमी, दीक्षाभूमी, एपीजे अब्दुल कलाम गार्डन, अमृत पाणीपुरवठा, बांबू प्रकल्प, सिमेंटीकरण, डांबरीकरण, नवीन चंद्रपूर, बाबा आमटे अभ्यासिका, प्रियदर्शनी नाटय़गृह, बसस्थानक, बॉटनिकल गार्डन, केंद्रीय सैनिकी विद्यालय, इरई नदी प्रकल्प, रामाळा तलाव अशी एक नव्हे तर विक्रमी २६०० कोटींच्या विकासकामांला सुरुवात केली. या विकासाच्या झंझावातासमोर काँग्रेसचा वाढीव मालमत्ता कराच्या मुद्दय़ाचा टिकाव लागला नाही. परिणामी, भाजपचा आलेख वाढत गेला. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ६६ पैकी ४५ जागा दिसत होत्या, परंतु मुलाखतींचा कार्यक्रम आणि तिकीट वाटपातील गोंधळानंतरच्या सर्वेक्षणात भाजपचा आकडा दहाने कमी होऊन ३५ वर आला. १५ ते २० जागा कमी दाखवीत असल्याचे पाहून मुनगंटीवार व अहिर या दोन्ही मंत्र्यांची झोप उडाली. प्रचार तोडा थंडावल्यानंतर दोन्ही मंत्री रस्त्यावर उतरले. या शहरातील प्रत्येक प्रभागाच्या गल्लीबोळांमध्ये या दोन्ही मंत्र्यांचा ताफा अशा पद्धतीने फिरला की जणू काही तेच निवडणुका लढत आहेत. दलित, मुस्लीम, हिंदू, तेली, माळी, कुणबी तसेच हिंदी भाषक अशा प्रत्येक समाजाच्या बैठका या दोन्ही मंत्र्यांनी घरोघरी लावल्या. मध्यरात्री दोन ते तीन वाजेपर्यंत हे दोन्ही मंत्री फिरले. याउलट संपूर्ण निवडणुकीत काँग्रेसची प्रचार यंत्रणाच उभी राहिली नाही.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी खासदार नरेश पुगलिया, विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, अविनाश वारजूकर, प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा वाहिली. शहर अध्यक्ष नंदू नागरकर प्रतिष्ठेच्या लढतीमुळे स्वत:च्या प्रभागात अडकून पडले होते. अशाही स्थितीत प्रचार काळात काँग्रेसची स्थिती बऱ्यापैकी होती. या पक्षाचे संख्याबळ इतके खाली घसरेल असे कुणाला वाटले नाही. या पक्षाच्या स्थानिक व राज्य पातळीवरील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांना सोबत घेतले नाही. त्यामुळेच येथे मोठे नुकसान झाल्याचे आता दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते महापालिकेत भाजपला मदत करणाऱ्या १२ नगरसेवकांचा वाद मुंबईत अखेरच्या क्षणापर्यंत घेऊन बसले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष हे कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ होते. भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं आघाडीची आवश्यकता आहे. ही बाब ओळखून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तसे प्रयत्न केले होते. तसे झाले असते तर आज चित्र वेगळे असते.

बहुजन समाज पक्षाला आठ जागा मिळाल्या. पक्षाचे हे यश लक्षणीय मानले जाते. हे यश बसपचे नसून धनराज सावरकर, प्रदीप डे, कारंगल, कश्यप व अनिल रामटेके यांचे व्यक्तिगत यश आहे. या प्रभागात बसपची शक्ती नसून या व्यक्तींची शक्ती आहे. शिवसेनेची येथे पुरती वाताहत झाली आहे. जिल्हा परिषदेपाठोपाठ सेनेला महापालिका निवडणुकीतही म्हणावे तसे यश मिळाले नाही. हा संपूर्ण दोष सेना नेत्यांचा आहे. याउलट सेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करीत पक्षाला किमान दोन जागांवर यश मिळवून दिले. प्रहारचे पप्पू देशमुख यांचा विजय हा त्यांचा व्यक्तिगत विजय आहे.

आघाडी नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका

विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ जागा या ३५ ते २०० मतांच्या फरकांनी पडल्या आहेत. याचाच अर्थ आघाडी झाली असती तर काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा फायदा झाला असता, किंबहुना दोन्ही पक्ष आज सत्तेत असते. दोन्ही काँग्रेस एकत्रित लढल्यास निवडणूक सोपी नाही, असा अंदाज भाजप नेत्यांना आला होता. त्यामुळेच भाजप नेत्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपाशी सलगी ठेवून असलेल्या नेत्यांना जवळ करीत आघाडी होऊ दिली नाही.

३० एप्रिलला महापौरपदाची निवडणूक

विद्यमान महापौर राखी कंचर्लावार यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या ३० एप्रिलला संपत आहे. त्याच दिवशी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेविका अंजली घोटेकर, अनुराधा हजारे व वंदना तिखे ही तीन नावे चर्चेत आहेत. यातील हजारे या अहिर, तर तिखे या मुनगंटीवार गटाच्या आहेत. घोटेकर या दोन्ही गटांच्या जवळ आहेत. त्यामुळे महापौरपदाची माळ कुणाच्या गळय़ात पडते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तर गटनेतेपदासाठी अनिल फुलझेले व वसंता देशमुख आणि उपमहापौरपदासाठीही याच दोघांची नावे चर्चेत आहेत.