सांगलीजवळ हरिपूरमधील घटना

ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी एकीकडे मोबाइलसारख्या अत्याधुनिक साधनाचा वापर सुरू असतानाच विरोधकांचा पाडाव करण्यासाठी सांगलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हरिपूरमध्ये करणी करण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर हरिपूर हे गाव असून या गावच्या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १६ सदस्य आणि एक थेट सरपंच निवडण्यासाठी सोमवारी मतदान होत असून आज प्रचाराच्या अंतिम दिवशी उमेदवारांवर करणी करण्याचा प्रकार गावच्या वेशीत आढळून आला.

गावच्या वेशीत १६ सदस्यांसाठी १६ लहान बाहुल्या आणि थेट सरपंच निवडीसाठी एक मोठी बाहुली अशा १७ काळ्या कपड्याच्या तयार करण्यात आलेल्या बाहुल्या टाकण्यात आल्या असल्याचे आढळले. या बाहुल्यावर गुलाल टाकण्यात आला असून लिंबूही ठेवण्यात आला आहे.  राजकीय वाद तीव्र स्वरूपाचा असून अनेक वेळा राजकीय वर्चस्वातून मारामारीचे प्रकारही घडले आहेत. आता निवडणुकीच्या मदानात मतदार कुणाला कौल देतात हे मंगळवारी कळणार असले तरी या ठिकाणी खरी चुरस भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आहे. या अटीतटीच्या लढतीमध्ये विरोधकांना जादूटोणा करून पराभूत करण्याचे मनसुबे कुणी रचले? काळ्या बाहुल्यांची पूजा कोणी मांडली? याबाबत गावातच नव्हे तर शिवेवरच्या सांगलीतही जोरदार चर्चा सुरू आहे.