सांगली जिल्ह्यातील कवठे एकंदमध्ये शोभेची दारू बनविणाऱया एका कारखान्यात सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटामध्ये सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून, त्यासाठी सांगलीमधून अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कवठे एकंद येथील ईगल कारखान्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या कारखान्यात काम करणारे कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. शोभेची दारू बनविण्यासाठी लागणारे कच्चे सामान कारखान्यात असल्यामुळे आग वेगाने पसरली. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत.