गावोगावच्या चावडीवर निकालावर पैजा

मुंबईत सेनाच येणार, झेडपीला कमळच फुलणार, हाताच्या मनगटावर घडय़ाळाचा पट्टा, बिनबुडाचे, बिनमुखडय़ाचे आमच्याच गटात हायती अशा चर्चा गावच्या पारकट्टय़ावर रंगल्या असतानाच चहाच्या एका कपापासून यंदाच्या हंगामातील बेदाण्याचा अख्खा सौदा देण्यापर्यंत आणि अर्धी मिशीपासून चमनगोटा करण्यापर्यंत निकालावर पजा लागल्या आहेत. या पजा पूर्ण होतात की नाही हे अलहिदा. मात्र गेले आठ दिवस सुरू असलेला गप्पांचा फड आता सत्तेच्या चावीवर येऊन ठेपला आहे. मुंबई महापालिकेपासून ते झेडपी, पंचायतीचा गुलाल कुणाचा, याचे उत्तर मिळण्यास आता काही तासांचाच अवधी उरला आहे.

राज्यातील १० महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होत आहेत. लोकसभा, विधानसभेपासून भाजपने घडवलेले सत्तांतर, शिवसेनेनेही घेतलेली मुसंडी आणि या दोघांच्या भांडणात नामशेष झालेले काँग्रेस, राष्ट्रवादी.. या साऱ्यांमुळे यंदाच्या या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निकालाकडे मुंबईपासून सांगलीतील गावापर्यंत सर्वाचेच लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज, चर्चेवरून गावोगावच्या चावडय़ा सध्या फुलून गेल्या आहेत. त्यातच काल जाहीर झालेल्या ‘एक्झिट पोल’च्या अंदाजामुळे या चर्चाना आता दावे-प्रतिदावे याचे रूप आले आहे. यातूनच निकालापूर्वी पैजांचा पाऊस पडू लागला आहे.

या चर्चेत सर्वाधिक लक्ष आहे ते मुंबई निकालावर. शिवसेना की भाजप या चर्चेत आता गावोगावी उभे गट पडले आहेत. ही चर्चा करणारी मंडळी अनेकदा या दोन पक्षांशिवाय अन्य पक्षातीलही असतात. मुंबईचा निकाल काय लागणार? त्याचा राज्य सरकारवर काय परिणाम होईल? मग त्यावेळी या सरकारला पाठिंबा कोण देईल? या चर्चानी गावोगावच्या चावडय़ा सध्या फुलून गेल्या आहेत. यातही प्रत्येकाच्या अंदाजाला पुन्हा त्यांच्या त्यांच्या अभ्यासाचा भाग जोडलेला असतो. जुन्या घटनांचे दाखले असतात. स्थानिक जिल्हा परिषदांच्या निकालाबाबतही या चर्चेत हीच चुरस सर्वत्र दिसत आहे. कुठला पक्ष बाजी मारणार, कुणाला फटका बसणार, स्वबळावरचे गणित, तिरंगी-चौरंगी लढतीतील सूत्र, धर्म-जातीची प्रमाणे असे सारे सारे इथे मांडले जाते. यातून मग अहमहमिकेने पैजाही लागतात. अगदी चहाच्या कपापासून भजी, भडंग, क्वार्टर, पार्टीपासून यंदाच्या हंगामात निघालेल्या बेदाण्याच्या सौद्यापर्यंत पजा लागल्या आहेत. काहींनी चमनगोटा करण्याचीही तयारी दर्शवली आहे.