सांगलीमधील मणेराजुरीमध्ये असलेले म.पा.सा हायस्कूल बॉम्बने उडवू, शाळेत कोणतीही परीक्षा घ्याल तर खबरदार! अशा धमकीचं पत्र आज प्राचार्यांना मिळालं. परीक्षा घ्याल तर शाळा बॉम्बने उडवून देऊ , शाळेत बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असंही या पत्रात म्हटलं होतं. या धमकीमुळे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक काही काळ तणावाखाली आले होते. त्यानंतर तातडीने पोलिसांना बोलाविण्यात आलं. पोलिसांनी कसून केलेल्या चौकशीत हा सगळा प्रकार दोन विद्यार्थ्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

या निनावी पत्रामुळे मणेराजुरीमध्ये आणि या शाळेत एकच खळबळ माजली होती. शाळेचे प्राचार्य पाटील यांना शाळेत बॉम्ब ठेवले असल्याचे हे पत्र मिळाले. ज्याबाबत त्यांनी तातडीने तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याबाबत कसून तपास केला.

ज्यानंतर प्राचार्यांना आलेले पत्र हे ६ वीत शिकणाऱ्या निखिल कोरवी आणि तुषार शिंदे यांनी संगनमताने लिहीलं असल्याची बाब समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे शाळेत काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. तासगाव पोलीस आणि सांगलीच्या बॉम्ब शोधक पथकाने शाळेचा संपूर्ण परिसर श्वान पथकासह पिंजून काढला, मात्र या दोन विद्यार्थ्यांच्या चौकशीत या दोघांनीच निनावी पत्र लिहील्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना पत्र का लिहीलं हे अद्याप समजू शकलेलं नाही.