* सहा महिन्यांत एकदाच एक हजार रुपये काढण्याची मुभा
* रिझव्र्ह बँकेच्या कारवाईने सात लाख ठेवीदार अडचणीत
राज्यभरात ३५ शाखा व सात लाख ठेवीदार असलेल्या पुण्यातील रुपी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व बँकेने र्निबध आणल्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांमध्ये शनिवारी एकच खळबळ उडाली. बँकेच्या खातेदाराला सहा महिन्यांत एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही, असे र्निबध आल्यामुळे बँकेशी संबंधित सर्व घटकांमध्ये फार मोठी अस्वस्थता पसरली आहे. थकीत कर्जाची अपेक्षित वसुली न झाल्यामुळे ही कारवाई बँकेवर झाली आहे.
बँकेला लागू केलेले र्निबध त्वरित अमलात आणण्याबाबत रिझव्र्ह बँकेकडून कळवण्यात आल्यामुळे शनिवारी सकाळी साडेदहापासूनच बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर र्निबध लागू झाले. रिझव्र्ह बँकेचे अधिकारी सकाळी बँकेच्या मुख्य कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी कारवाईचे पत्र बँकेला दिले. बँकिंग नियंत्रण कायद्याच्या कलम ३५अ अनुसार (अपेक्षित कर्जवसुली नाही) ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेवर यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई सन २००२ मध्ये करण्यात आली होती.
सध्याच्या संचालक मंडळातील काही ज्येष्ठ संचालकांच्या मनमानी कारभारामुळे हा प्रसंग ओढवला आहे. रिझव्र्ह बँकेने केलेली कारवाई ही ठेवीदार व खातेदारांसाठी दु:खदायक गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया रुपी बँक खातेदार संघटनेने व्यक्त केली आहे.
      बँक आर्थिक संकटातून जात असली, तरी ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.  गेल्या चार वर्षांत २५५ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. बँकेकडील ठेवी व  पैसे कुठेही जाणार नाहीत.    –  प्यारेलाल चौधरी, बँकेचे अध्यक्ष
बँकेवरील अन्य र्निबध
*    खातेदारांना कोणत्याही ठेवी ठेवता येणार नाहीत
*    बचत खाते वा चालू खात्यात रक्कम भरता येणार नाही
*    फक्त कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू ठेवता येईल
दृष्टिक्षेपात बँक : *  ३५ शाखा ’  तीन विस्तारित कक्ष  *  ५५ हजार सभासद  *  सात लाख खातेदार व ठेवीदार  *  ठेवी १,४०० कोटी  
*  कर्जे ७०० कोटी *  निव्वळ एनपीएचे प्रमाण २.७५ टक्के *  सरकारी रोख्यांमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक  *  इतर बँकांमधील ठेवी ७० कोटी