तालुक्यातील वाळवणे येथील जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न सोमवारी मध्यरात्री झाला. मात्र तिजोरी फोडण्यापूर्वी भैरवनाथ मंदिरात असलेल्या भाविकांना त्याची चाहूल लागून ते शाखेजवळ जमा झाल्याने चोरटय़ांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
या बँकेत सोमवारीच सुमारे पंधरा लाख रुपयांची रोकड जमा करण्यात आली होती. कदाचित चोरटय़ांना त्याची कुणकुण लागल्यामुळे त्यांनी चोरीचा प्रयत्न केला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा बँकेची ही शाखा ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये असून सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बँकेत सायरनची व्यवस्था आहे. परंतु चोरटय़ांनी शाखेत प्रवेश करूनही सायरन न वाजल्याने ही यंत्रणाही असून नसल्यासारखी असल्याचे उघड झाले आहे.
चोरटय़ांनी शाखेत प्रवेश केल्यानंतर तेथील कागदपत्रांची उचकापाचक केली. ही शाखा वाळवणे येथील प्रसिद्घ भैरवनाथ मंदिरालगत आहे. तेथे भाविक जागे असल्याने चोरटय़ांनी शाखेतील तिजोरी फोडण्याचा बराच वेळ प्रयत्न केला नाही. त्यांनी हा प्रयत्न करताच त्याची चाहूल भाविकांना लागली. त्यांनी शाखेजवळ येऊन कुजबूज सुरू करताच चोरटय़ांनी तेथून पळ काढल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सुपे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली.