मृग नक्षत्राच्या धडाकेबाज सलामीनंतर आद्र्रा नक्षत्राने मात्र निराशा केली. गेल्या तीन दिवसांपासून तुंबारी नावाच्या वाऱ्याचा जिल्ह्यासह मराठवाडय़ात कहर सुरू असल्याने पावसानेही दडी मारली आहे. त्यामुळे नुकतीच उगवलेली पिकांची कोंब कोमेजून जाण्याचा धोका वाढला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पेरण्या आटोपल्या असून, तुरळक ठिकाणीच दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. मात्र, ज्यांनी पेरणी केली अशांवर दुबारपेरणीची वेळ येती की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नेहमीच दुष्काळाच्या दाहकतेत होरळपणाऱ्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना यंदा मृगाच्या पावसाच्या पेरण्या करण्याचा दुर्मिळ योग जुळून आला. परभणी जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्राने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. या वर्षी कोल्हा या वाहनाने ८ जूनला मृग नक्षत्रास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मृगाच्या सरी बरसल्या. जिल्ह्याच्या अनेक भागात मृगाचा समाधानकारक पाऊस पडला. परभणी, जिंतूर, पाथरी या तालुक्यांत सुरुवातीपासूनच पावसाचा जोर अधिक होता. जिंतूर आणि िहगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याच्या सीमेलगत झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या भागातील नदीनाल्यांना पूर आला होता. संपूर्ण मृग नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात जिल्हाभरात पावसाचा ढोल वाजत होता.
पहिल्या एक-दोन पावसानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने मशागतीची अंतिम कामे उरकून घेतली. त्यानंतर सलग पाऊस पडत असल्याने पेरणीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे समजून जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी वेगात पेरणीला सुरुवात केली. कापसाची लागवड सर्वच शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात पूर्ण केली. सोयाबीन, तूर या पिकांच्याही पेरण्या उरकून घेतल्या. अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने यंदा मूग आणि उडदाचीही पेरणी शेतकऱ्यांना करता आली. ज्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या, अशांच्या शेतावर पिकांचे कोंब येण्यास सुरुवात झाली. काही भागांत नुकत्याच पेरण्या पूर्ण झाल्या, तर जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी पेरणीला सुरुवात केली होती. मात्र, सोमवारपासून जिल्हाभरात तुंबारी नावाचे वारे वेगाने वाहत आहे. हे वारे संपूर्ण मराठवाडय़ात वाहत असल्याने पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे राहिलेल्या पेरण्यांचा खोळंबा झालाच, तसेच जमिनीवर आलेले कोंबही कोमेजून जाण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसापासून पावसाने दडी मारली असून आकाशात लख्ख ऊन पडले आहे. सोबतीला वारा वाहत असल्याने जमिनीची ओल झपाटय़ाने कमी होत चालली आहे. कधी नव्हे ते यंदा वेळेत पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र पावसाने मध्येच दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून यंदाही दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांंपासून नसíगक संकटांचा ससेमिरा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी यानंतर पुन्हा मागचा कोरडा गेलेला हंगाम या सर्व संकटावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदा मृगात दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.