देशात सध्या उद्योजक घराणी राजकारणात येत असणे हे सामान्य माणसाच्या दृष्टीने घातक आहे, असे मत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या वृंदा करात यांनी सांगलीत व्यक्त केले. जनवादी महिला संघटनेच्या दहाव्या अधिवेशनात त्या बोलत होत्या. या वेळी बोलताना श्रीमती करात म्हणाल्या की, पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला २० टक्के मतदान झाले. मात्र तेथे असणाऱ्या तृणमूल काँग्रेसची दहशत वाढली आहे. पोलीस या तक्रारीची दखल घेत नाहीत. गुंडगिरी विकोपाला गेली असून अत्याचारित महिलेलाच तक्रार मागे घेण्यासाठी बलात्काराची धमकी दिली जाते असा आरोप केला. लोकशाहीत सामान्य माणसालाही निवडणूक लढविण्याचा अधिकार असला तरी सध्या सामान्याच्या दृष्टीने या निवडणुका लढविणे अशक्य होत आहे.