‘बीएसएनएल’ची वारंवार खंडित होणारी सेवा, अकार्यक्षम कार्यपद्धती व ग्राहकांना होणाऱ्या असुविधेमुळे खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता टेलिफोन भवन या कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यातील ‘बीएसएनएल’च्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे मोबाइल व टेलिफोनची सेवा पूर्णत: विस्कळीत झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील बीएसएनएल सेवेबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असून अनेक भागांमध्ये सेवा खंडित झालेल्या आहेत. खासगी कंपन्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु दूरसंचार परभणी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्राहकांना सेवा व सुविधा सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे ‘बीएसएनएल’चे ग्राहक खासगी कंपन्यांच्या मोबाइल सेवेकडे वळत आहेत.
परभणी येथील बीएसएनएलचे महाप्रबंधक हे पद मागील अनेक वर्षांपासून रिक्त असल्याकारणाने याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. या विभागांतर्गत कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे ग्राहकांना सुरळीत सेवा मिळत नाही. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये टॉवर उभे केलेले असून त्यांना रेंज नसल्यामुळे ते केवळ शोभेची वस्तू बनलेले आहेत. ग्राहकांकडून अनेक भागांमध्ये टॉवरची मागणी मोठय़ा प्रमाणावर आहे. परंतु ‘बीएसएनएल’कडून त्यास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे आंदोलन करणार असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले.