शहरापासून गावपातळीपर्यंत मोठय़ा प्रमाणात इंग्रजी शाळांची दुकानदारी सुरू झाल्याने सरकारी शाळांना विद्यार्थी मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. दुसरीकडे शाळांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांसाठी गुरुजी दारोदारी आणि मुलांना आकर्षति करण्यासाठी खासगी शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेशापासून शालेय साहित्य देण्याची योजना राबवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सरकारी शाळांसमोर विद्यार्थी मिळवण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तर नोकरी टिकवण्यासाठी खासगी शाळेतील गुरुजी पदरमोड करून मुलांच्या पालकांना आकर्षति करीत आहेत.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून खासगी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्या आहेत. सरकारी पातळीवरून खिरापतीप्रमाणे खासगी संस्थांना शाळा देण्यात आल्याने इंग्रजी शाळांची दुकानदारी शहरापासून गावापर्यंत फोफावली. गरजेपेक्षा मोठय़ा प्रमाणात शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी मिळवण्यासाठी आता स्पर्धा वाढीस लागली आहे. खासगी शाळांमध्ये पटसंख्या राहिली, तरच शिक्षकाचे पद टिकते. त्यामुळे संस्थाचालकांनी शिक्षकांनाच नोकरी टिकवायची असेल, तर विद्यार्थी मिळवा असे बजावल्याने गुरुजी दारोदारी पालकांची मिनतवारी करू लागले आहेत.
ग्रामीण भागात तर गुरुजी नातेवाईकांची मुले आपल्या शाळेत यावीत, या साठी नात्या-गोत्यांच्या साखळीनेच प्रयत्न करू लागले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही विद्यार्थी मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यासाठी शाळा व्यवस्थापनाने मोफत स्कूल बस, गणवेश, इतर शालेय साहित्य देण्याचे आमिष दाखवून मुले मिळवणे सुरू केले आहे. शाळा व गुरुजींची गरज लक्षात घेऊन पालकही आता तडजोडीबरोबरच जास्तीत जास्त सवलत कोणत्या शाळेतून मिळते, त्या शाळेकडे जाण्याचा प्रयत्नात आहेत. तालुक्याच्या ठिकाणी मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सवलतींच्या जाहिराती करून मोठय़ा प्रमाणात शुल्क उकळण्याचा प्रयत्नही केला जात आहे. सरकारी शाळांसमोर मात्र खासगी शाळांच्या स्पध्रेत विद्यार्थी मिळवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. एकूणच गरजेपेक्षा जास्त शाळांची दुकानदारी सुरू झाल्याने शिक्षणाचा पुरता बाजार झाल्याचे चित्र दिसत आहे.