पोलीस, सावकारांनी हातमिळवणी करून बर्फ कारखाना बळकावला?

सावकार आणि पोलिसांच्या त्रासाला कंटाळून येथील एका बर्फ कारखानदाराने मुख्यमंत्र्यांकडे दाद मागत विष प्राशन केले. शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

बशीर कासीमसाहेब शेख (वय ५५, रा. रेल्वे लाइन्स, सोलापूर) असे विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दुर्दैवी बर्फ कारखानदाराचे नाव आहे. विष घेण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालकांसह सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त व जिल्हय़ाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपली कैफियत मांडली होती. यात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह सावकार गणेश विठ्ठल जाधव व मौला पीरप्पा गायकवाड (रा. सेटलमेंट, लिमयेवाडी, सोलापूर) यांनी आपणास आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केल्याचा गंभीर आरोप करीत त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांसह इतरांना पाठविलेल्या पत्रात बशीर शेख यांनी मांडलेली कैफियत अशी, की अक्कलकोट रोड एमआयडीसीत बशीर शेख यांचा बशीर आईस फॅक्टरी या नावाचा बर्फ कारखाना गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी आर्थिक विवंचनेतून मौला गायकवाड व गणेश जाधव या सावकारांकडून आठ लाखांचे कर्ज घेतले होते. ठरलेल्या व्याजासह कर्जाची वेळेत परतफेड करूनही शेख यांनी कर्जासाठी गहाणखत करून दिलेल्या बर्फ कारखान्याच्या मालमत्तेची कागदपत्रे परत न करता त्यांचा दुरुपयोग करून दोघा सावकारांनी शेख व त्यांच्या कुटुंबीयांना धमकावत हुसकावून लावत लाखो रुपये किमतीचा संपूर्ण बर्फ कारखानाच बळकावला. त्यातील बहुतांश साधनसामग्रीची चोरी करून परस्पर विल्हेवाटही लावली. या बर्फ कारखान्यावर शेख कुटुंबीयांची उपजीविका चालते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शेख यांच्या बाजूने दिलेल्या न्यायालयीन निकालाविरुद्ध गायकवाड व जाधव यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले असता त्याावर अद्यापि सुनावणी प्रलंबित आहे. हे प्रकरण मुळात दिवाणी स्वरूपाचे असताना दोघा सावकारांनी धाकदपटशा दाखवून बशीर शेख यांचा बर्फ कारखाना परस्पर बळकावला असताना त्या विषयी शेख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाद मागितली. परंतु पोलीस यंत्रणेने कायदा व मुंबई पोलीस मॅन्युअलचा भंग करीत अधिकारपदाचा दुरुपयोग केला. यात सावकारांना मदतच झाली, असे शेख यांचे म्हणणे आहे. दरम्यान, बेशुद्धावस्थेत शेख यांना छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर परंतु स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सागितले. या घटनेची दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधित पोलीस निरीक्षकासह दोघा सावकारांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेख कुटुंबीयांनी केली आहे.

पोलिसांनी आरोप फेटाळले

या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. व्ही. पाटील यांनी आपल्यावर शेख यांनी केलेले आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. आपण शेख यांच्या बर्फ कारखान्याची मालमत्ता गायकवाड व जाधव यांना मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. शेख यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता त्यांनी ती सादर केली नाहीत. शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आरोप खोटा आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.