जिल्हय़ातील उच्चभू वस्तीतील व जे सतत मतदानापासून वंचित राहतात, त्यांच्यासाठी विशेष मतदार जागृती अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली.
उच्चभ्रू मतदार विविध विषयांवर चर्चा करतो, मते मांडतो. मात्र, मतदानाच्या दिवशी सुटी घेतो. आपल्या मतदानाने काय फरक पडणार? असा नकारात्मक विचार तो करतो, हे विविध निवडणुकांतून समोर आले. अशा वस्त्या हेरून तेथील नागरिकांचे भ्रमणध्वनी मिळवून त्यांना एसएमएसद्वारे मतदानास प्रवृत्त करण्यास मोहीम राबवली जाणार आहे. आदल्या व मतदानाच्या दिवशी मतदानाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्हाभर राबवण्यात येणाऱ्या मतदान जागृती अभियानात ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांचाही समावेश असेल. ओल्या बाळंतिणीनेही मतदान करावे, यासाठी आशा कार्यकर्तीमार्फत गावोगावी संपर्क साधला जाणार आहे. कामगार अधिकाऱ्यांमार्फत रेल्वेस्थानकावर हमालीचे काम करणारे माथाडी कामगार व बाजार समितीत हमालीचे काम करणारे यांचे मेळावे घेऊन मतदानाचे महत्त्व पटवले जाईल. रोहयो व विविध कष्टकरी कामे करणाऱ्या मजुरांनाही मतदानाचे महत्त्व पटवून देण्यास मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. शासकीय सेवेत असणारे व विशेषत: मतदानाच्या दिवशी कर्तव्य बजावणारे कर्मचारीच मतदानापासून वंचित राहतात. अशा कर्मचाऱ्यांनी मतदान करावे, यासाठी त्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. मतदानाच्या काळात पोलीस कर्मचारी मोठय़ा संख्येने आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यांनी मतदान करावे, यासाठी प्रबोधनाची मोहीम राबवली जाईल. त्यासाठी विशेष पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे उपस्थित होते.