कॅनडाचे कौन्सिल गव्हर्नर जॉर्डन रिव्हज यांचे आश्वासन

पंढरपूरचा विकास ‘स्मार्ट तीर्थक्षेत्र’ म्हणून करणार आहे. या साठी योग्य नियोजन आणि त्याचा आराखडा निश्चित केला जाईल, असे कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज यांनी स्पष्ट केले. तर पंढरीच्या विकासाबाबत सर्वाची मते जाणून घेऊन विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले

येथील तुकाराम भवन येथे ते बोलत होते. कॅनडाचे कॉन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज, अँजेला शूवॉटर तारा यांनी आज पंढरपुराला भेट दिली. सकाळी ११ च्या दरम्यान हेलिकॉप्टरने ते येथे आले. त्यानंतर त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. मंदिराची पाहणी करून बांधकाम आणि इतर माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर चंद्रभागा नदी पात्र आणि मंदिर परिसराची पाहणी केली त्यानंतर संत तुकाराम भवन येथे कॅनडाच्या टीमने वारकरी, नागरिकांशी संवाद साधला. या वेळी पालकमंत्री विजय देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार भारत भालके, आ. यशोमती ठाकूर, आ. प्रशांत परिचारक, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले आदी उपस्थित होते.

कौन्सिल गव्हर्नर जॉर्डन रिव्हज म्हणाले, मी गेली दोन वष्रे भारतात आहे. पण पंढरपुरातील नागरिकांनी दिलेले प्रेम पाहून भारावून गेलो. येथे आल्यापासून लोक माझा सत्कार करत आहेत. मला भेटत आहेत. माझ्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा आहे. पंढरपूर अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

दरवर्षी मोठय़ा संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॅनडा सरकार पंढरपूरला स्मार्ट तीर्थक्षेत्र करू इच्छित आहे. यासाठी येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, भाविक आणि सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल. स्मार्ट तीर्थक्षेत्र करण्यासाठी योग्य नियोजन आणि त्याचा आराखडा निश्चित केला जाईल, असे रिव्हज यांनी सांगितले.

या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, आ. भारत भालके, डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा साधना भोसले, मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचीही भाषण झाली.

रुक्मिणीमातेच्या गावाचाही विकास करा

विदर्भातील कौंडिण्यपूर हे रुक्मिणीमातेचे गाव असल्याने त्या तीर्थक्षेत्राचाही विकास कॅनडा सरकारने करावा. मी सासरी आली आहे. सासरकडून माझ्या अपेक्षा आहेत. कौंडिण्यपूर येथील विकासाबाबत आराखडा तयार केला आहे. याकामी कॅनडा सरकारने ५०० कोटींची मदत करावी, अशी मागणी आमदार यशोधरा ठाकूर यांनी या वेळी केली.