नांदेडातील काँग्रेसचे विद्यमान खासदार लोकसभेत निष्क्रिय राहिले. त्यामुळे काँग्रेसचा खासदार पराभूत होणारच, या भीतीने अशोक चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी करण्याची वेळ आली, तरीही मोदी लाटेत काँग्रेसला हद्दपार करा, असे आवाहन भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.
महायुतीचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्या प्रचारार्थ मुखेड येथे आयोजित सभेत मुंडे बोलत होते. मुंडे यांनी सांगितले, की जिल्हय़ात विविध योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला. गैरव्यवहार म्हणजेच काँग्रेस असे समीकरण झाले आहे. विद्यमान खासदाराने ५ वर्षे निष्क्रिय राहून नांदेडकरांना फसविले. त्यामुळे मतदारांनीच भाजपला मतदान करून काँग्रेसला संपविण्याची वेळ आली आहे.
जिल्हय़ात सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असताना गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा होत आहे. देशात नरेंद्र मोदींची लाट असल्यामुळे काँग्रेस उमेदवार हादरले आहेत. अशोक चव्हाण यांना दोन दिवस मुखेडला गल्लीबोळात फिरावे लागले, हे स्थानिक आमदाराचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला मतदार कंटाळले असून देशात भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा मुंडे यांनी केला.
माजी आमदार किशनराव राठोड यांनी मी अशोकरावांपेक्षा ३० वर्षांनी मोठा आहे. त्यांनी गैरव्यवहार व मतदारसंघाचा सत्यानाश करणाऱ्यास पाठीशी घातले म्हणून मी भाजपत प्रवेश केला असल्याचे सांगितले. गोविंदराव राठोड, गंगाधर राठोड, डॉ. तुषार राठोड, विश्वनाथ सूर्यवंशी, जावेद कुरेशी, प्रभाकर आदींसह अनेकांनी या वेळी भाजपत प्रवेश केला. विजय गव्हाणे, राम पाटील रातोळीकर, गंगाराम ठक्करवाड, सुभाष साबणे, गोविंदराव राठोड, गंगाधर राठोड, नगराध्यक्ष लक्ष्मीबाई कामजे, गौतम काळे आदी उपस्थित होते.
राठोड परिवारास न्याय देणार- मुंडे
माजी आमदार किशनराव राठोड व त्यांच्या परिवाराने काँग्रेसच्या गुलामी राजवटीस कंटाळून भाजपत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसची नीतिमत्ता उघड झाली आहे. आगामी काळात राठोड परिवार व भाजपची ताटातूट होऊ देणार नाही व त्यांना भाजपत सन्मान करून योग्य न्याय देणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली.