आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून मतदानाच्या दिवशी साडेपाच वाजता बूथ ताब्यात घेतले. १० जणांना पोलिसांनी दुसऱ्या दिवशी पहाटे अटक केली. न्यायालयाने सर्व आरोपींना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सर्व आरोपी औरंगाबाद, आष्टी व नगर येथील महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. मतदानादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नवलकिशोर राम यांनी एक समिती नियुक्त केली असून निवडणुकीदरम्यान घडलेल्या प्रत्येक गुन्ह्य़ांचे नव्याने विश्लेषण केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी आणि जाणीव जागृतीसाठी ग्रामसभाही घेतल्या जाणार आहेत. या मतदान केंद्रावर २४ एप्रिल रोजी फेर मतदान घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली आहे.
   बीड लोकसभा मतदारसंघात १७ एप्रिल रोजी मतदान झाले. आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी या पाचशे लोकसंख्या असलेल्या गावातील मतदान केंद्र क्र. २१३ या ठिकाणी शांततेत मतदान सुरू होते. सायंकाळी साडेपाच वाजता पक्षांचे प्रतिनिधी मतदान केंद्राबाहेर गेले. त्याचदरम्यान १५ तरुण मतदान केंद्रात घुसले. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. मतदान यंत्र ताब्यात घेऊन मतदान केले. या बाबत तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी  केंद्रातील मतदान यंत्र, झालेले मतदान यांची तपासणी केली. त्यात या मतदान केंद्रावर एकूण ३९५ मतदारांपकी ३०३ मतदारांनी हक्क बजावला. मात्र, मतदान यंत्रात ३११ मते नोंदवली गेली  होती. याबाबत मतदान केंद्रप्रमुख विकास गुणाजी अदमुले यांचा व इतर दोन कर्मचाऱ्यांचा लेखी जबाब घेण्यात आला. त्यात मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान केल्याचे स्पष्ट झाले. झालेला प्रकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पोलिसांना कळविला. दुसऱ्या दिवशी  १८ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आष्टी पोलिसांनी आंधळेवाडी येथील सुभाष आंधळे, आजिनाथ आंधळे, बबन आंधळे, बाळु आंधळे, भीमराव आंधळे, विश्वजित आंधळे, संभाजी वनवे, अशोक आंधळे, भाऊसाहेब आंधळे यांना अटक केली. यातील बहुतांश कार्यकर्ते भाजपचे आहेत. या सर्वाना तालुका न्यायालयाने २२ एप्रिलपयर्ंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंशिकांत डोके यांनी दिली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा, सालेवडगांव, आंबेवाडी, पोखरी, आष्टी शहर, शिरूर तालुक्यातील कान्होबाची वाडी, विघ्नेवाडी या गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप करून फेरमतदानाची मागणी केली आहे. याबाबत मात्र कुठेही बोगस मतदान झाल्याचे स्पष्ट होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
परळी आणि आष्टी या दोन मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे प्रशासनाला वाटत होते. त्यामुळे तेथे अधिक बंदोबस्त होता. आंधळेवाडी हे आडवळणी आणि लहान गाव असल्याने तेथे पोलिसांचा पहारा होता. मात्र सशस्त्र बंदोबस्त देण्यात आला नव्हता. सर्वत्र सशस्त्र दलाचे जवान ठेवणे अवघड होते. शेवटच्या काही मिनिटांत मतदान केंद्र ताब्यात घेऊन झालेला हा प्रकार मतदान केंद्र अध्यक्षांसह सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला तातडीने कळवला. फेरमतदानाची मागणीही आयोगाकडे करण्यात आल्याचे नवलकिशोर राम यांनी सांगितले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकजण औरंगाबाद येथे प्राणिशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. अन्य विद्यार्थी नगर आणि आष्टी येथील महाविद्यालयात शिकत आहेत. केंद्र ताब्यात घेताना त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते, असे रेड्डी म्हणाले.