एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी उभारलेल्या रांगेत भरधाव कार घुसल्याने १४ जण जखमी असून यातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोलापूर शहरात शुक्रवारी सकाळी १०.३० ते १०.४५ च्या सुमारास घडली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून चालकाला अटक करण्यात आली आहे. संतोष माळगे असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या चालकाला जमावाने बेदम चोप दिला व कारची नासधूस केली.

सोलापूर शहरातील विजापूर रोड भागातील कोटणीस नगर परिसरात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएमवर पैस काढण्यासाठी मोठी रांग लागली होती. एटीएमच्या जवळच असलेल्या बंगल्यातून संतोष माळगे याने आपली कार बाहेर काढली व थेट रांगेत घुसवली. यामुळे १४ लोक जखमी झाले. संतोष माळगे याने कार न थांबवता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे एका बंगल्याच्या गेटला जाऊन तो धडकला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने त्याला पकडून बेदम मारहाण केली. कारचीही मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आली. जमावाने संतोष माळगेला विजापूर नाका पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने मद्य सेवन केले होते किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दिली.
चलन तुटवड्यामुळे शहरातील अनेक एटीएम बंद अवस्थेत आहेत. जे एटीएम सुरू असतात त्याच्यासमोर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे.