निमशहरी महाराष्ट्रातील पहिले डिजिटलपान दुकान

केंद्र शासनाने ‘गो कॅशलेस, गो डिजिटल‘ हे धोरण राबवण्यास सुरवात केली आहे. या अंतर्गत ‘कॅशलेस’ म्हणजेच रोकडरहित समाज ही नवी संकल्पना निर्माण झाली आहे. या व्यवहाराबाबत विविध माध्यमांतून होणाऱ्या जनजागृतीमधून प्रेरणा घेऊन सांगलीतील विजय पाटील यांनी आपल्या पानाच्या दुकानात ‘स्वाईप मशिन’चा वापर करण्यास सुरवात केली आहे. गंमत अशी, की चलनाअभावी अन्य पान टपऱ्या ग्राहक शोधत असताना पाटील यांच्या दुकानातील धंद्यात मात्र वाढ झाली आहे. ‘स्वाइप मशिन’द्वारे व्यवहार करणारे राज्यातील छोटय़ा शहरातील हे असे पहिले डिजिटल पानाशॉप असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

पाटील मूळचे विज्ञान शाखेतील वनस्पतीशास्त्र उपशाखेचे पदवीधर. परिस्थिती नसल्याने त्यांनी पानाचा ठेला सुरू केला. महिनाभरापूर्वी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय झाला. त्यानंतरच्या घडामोडी त्यांच्या व्यावसायिक नजरेने टिपल्या आणि ‘कॅशलेस’ व्यवहाराचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. ग्राहकांकडे एकतर पैसे नाहीत असले तरी ते २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये. यामुळे १०, २० रुपयांच्या व्यवहारातील धंदे हे जवळपास बंद पडण्याच्याच मार्गावर होते.  यातूनच त्याने आपले दुकानही ‘कॅशलेस’ करण्याचे ठरवले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने त्यांनी हे यंत्र बसवले आणि परिसरातीलच नाही तर शहरातील शौकीन त्यांच्या दुकानात रांगा लावू लागले. एकतर पान टपरीची सवय लोकांना स्वस्थ बसू देत नाही आणि त्यात आता अशी सोय झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि पाटील यांचे दुकान ग्राहकांनी भरून गेले आहे. सुटय़ा पैशांअभावी अनेक दुकानदार ग्राहकाची वाट पाहत असताना माझ्या धंद्यात मात्र गेल्या काही दिवसांत वाढ झाल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.