मराठा समाजाच्या राज्यभरात निघत असलेल्या मूक मोर्चाबाबत ‘सामना’ वृत्तपत्रातून वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्यासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. परभणी पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे, संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्यासह पाच जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान औरंगाबाद येथील मुकुंदनगर पोलीस ठाण्यातही या सर्वांविरोधात शिवक्रांती युवा सेनेने गुन्हा दाखल केला आहे.
कोपर्डी घटनेचा निषध, मराठा आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे राज्यभरात विक्रमी गर्दीत शांततेत मोर्चे काढले जात आहेत. सामना दैनिकाच्या रविवारच्या अंकात आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या महिलांची बदनामी झाली असून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या व्यंगचित्रातून समाजात तेढ निर्माण होईल, अशी आशयाची तक्रार अॅड. विष्णु नवले यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरून परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यात सामनाचे संपादक उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सामनामध्ये हे व्यंगचित्र प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर शिवसेनेवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली. मंगळवारी शिवसेनेच्या नवी मुंबई येथील कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. शिवसेनेच्या दोन आमदार व खासदारांनीही याप्रकरणी लगेचच राजीनामा अस्त्र उगारले होते. शिवसेनेने व्यंगचित्रातली भूमिका आपली नसल्याचा खुलासा केला होता. परंतु बुधवारी हे वादग्रस्त व्यंगचित्र काढलेले श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी सामनाच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली होती. कोणत्याही समाजाला दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असे त्यांनी आपल्या खुलाशात म्हटले होते.