पोलीस यंत्रणेने शहरात आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोख सुरक्षा व्यवस्था उभी केली असून, शहरात महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे ‘परभणीकरांनो सावधान, तुमच्या हालचालींवर नजर आहे’ असाच संदेश या यंत्रणेद्वारे देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सोमवारी याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाची जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी पाहणी केली. सहायक पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची या वेळी उपस्थिती होती. शहरात तब्बल ३७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, हे कॅमेरे सहा दिवसांपासून कार्यरत झाले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये एक कॅमेरा सर्वात मोठा असून तो ३६० कोनात गोल फिरतो. २३ एक्स झूम क्षमतेचा असून एक किलोमीटर अंतरापर्यंतची दृश्ये टिपतो. हा कॅमेरा ईदगाह मदानावर बसविला आहे. उर्वरित ३७ कॅमेरे ३ मेगा पिक्सलचे असून या कॅमेऱ्यांची क्षमता २०० मीटपर्यंतचे अंतर टिपण्याची आहे. मुख्य म्हणजे हे सर्व कॅमेरे दिवसा व रात्रीही चालू राहणार असून अंधार पडल्यानंतरही सर्व हालचाली टिपल्या जाणार आहेत.
परभणी पोलीस दलातर्फे ऑनलाइन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा बसविण्याबाबत निविदा मागविल्या होत्या. यात केलट्रॉन प्रा. लि. (मुंबई) या कंपनीस हे कंत्राट देण्यात आले. ही सर्व यंत्रणा ५५ लाख रुपयांची आहे. परभणी बसस्थानक, रेल्वेस्थानक प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अष्टभुजा चौक, आर. आर. टॉवर, गुजरी बाजार शिवाजी चौक अशा गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी हे कॅमेरे बसविले आहेत. अधीक्षक कार्यालयात या कॅमेऱ्यांचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष उघडला असून शहरात बसविण्यात आलेल्या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण या कक्षातून होणार आहे. या साठी तज्ज्ञ अभियंत्यासह तीन पोलीस कर्मचारी कार्यरत असतील.
रमजाननिमित्त चोख बंदोबस्त
रमजान ईदनिमित्त जिल्हा पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त तैनात केला असून, मुख्य बाजारपेठ, प्रमुख रस्ते, चौक, ईदगाह मदान, सर्व मशिदींच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस तनात केले आहेत. िहगोलीतील राज्य राखीव दल तुकडीचा यात समावेश आहे. परभणी पोलीस दलातील एकूण संख्येपकी ८० टक्के पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. यात ७ उपअधीक्षक, १७ निरीक्षक, ७ सहायक निरीक्षक यांच्यासह ७५० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.