आमदार अमित देशमुख यांचा राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, स्थायी समिती सभापती अख्तर शेख यांच्यासह दीपक सूळ, गिरीश पाटील, रवि जाधव आदी नगरसेवकांनी प्रभागात फटाके फोडून आनंद साजरा केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे यांनी देशमुख यांच्या मंत्रिपदामुळे जिल्हय़ात काँग्रेसला पुन्हा उभारी मिळेल. कारभार अधिक लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अभियंता पदवीधर असलेल्या अमित देशमुख यांनी २००९च्या निवडणुकीत ९० हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळविला. विकास कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात देशपातळीवर लौकिक मिळवला. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नक्की मानला जात होता, मात्र काही ना काही कारणाने तो सतत पुढे ढकलला जात असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आशा सोडून दिली होती. लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ाची धुरा अमित देशमुख यांच्यावर होती. सर्वच विधानसभा मतदारसंघांत भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाल्यामुळे देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश आता होणार का, अशी साशंकता तयार झाली होती. मात्र, सोमवारी मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर देशमुख समर्थक कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला.