शिवसेना आणि भाजप युतीच्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी खोचक टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी १५ वर्षे एकत्र सत्तेत राहिल्यानंतर त्यांच्यात वादाला सुरूवात झाली होती. मात्र, सत्तेत येऊन १५ दिवस झाल्यानंतरच शिवसेना आणि भाजपमध्ये भांडणाला सुरूवात झाल्याचे भुजबळांनी म्हटले. सरकारमध्ये एकत्र असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही काही भांडणे झाली. मात्र, दोन्हीकडील नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हे वाद शमले. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये आत्तापासूनच वाद सुरू झाले असून, हे राज्यासाठी चांगले लक्षण नसल्याची टीका भुजबळांनी केली. गुजरातचे सरकार पाणी मिळवण्यासाठी धडपड करु शकते, तर महाराष्ट्र सरकारचे प्रयत्त का कमी पडत आहेत, असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला. पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरजही छगन भुजबळांनी यावेळी बोलून दाखवली.