ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांची ‘चाय पे चर्चा’ रंगणार आहे. यासाठी नवेगाव येथे खास आधुनिक पध्दतीचे मचाण बांधण्यात आले असून तेथे पर्यटकांना अवघ्या ४०० रुपयात ही चर्चा करतांना वाघ, बिबटे, पशुपक्षी व अन्य वन्यजीव बघण्याचा आनंद घेता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या व्याघ्र प्रकल्पाकडे जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयोगशील उपक्रम राबविले जात आहेत. जिप्सी व कॅन्टर सफारीसोबतच येथे हत्तीची सफारी आहे.
आता इरई धरणाच्या जलाशयात बोटिंग सफारी सुरू करण्यात आली आहे. छायाचित्रकार पर्यटकांसाठी सलग १२ तासांची सफारीही या प्रकल्पात आहे. आता तर पर्यटकांसाठी खास ‘चाय पे चर्चा’ हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांचा दाभडीचा ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम लोकप्रिय झाला होता. त्यांच्या याच कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व ताडोबाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ.जे.पी. गरड यांनी पर्यटकांना ताडोबा प्रकल्पाकडे आकर्षित करण्यासाठी उपयोग केला आहे. यासाठी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील नवेगाव प्रवेशव्दारावर खास सिमेंटची आधुनिक मचाण बांधण्यात आलेली आहे. या मचाणीवर ‘चाय पे चर्चा’ साठी चार खुर्ची, टी-टेबल, पुस्तके आदि ठेवण्यात आलेले आहे.
ताडोबाच्या बफर व कोअर क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना या मचाणीवर बसण्यासाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहे. यात केवळ चार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असून त्यांना चहा किंवा कॉफी, एक थंड पाण्याची बॉटल व ताडोबाचे सोव्हिनियर बुक दिले जाणार आहे.
चहा व कॉफी पिता पिता पर्यटकांना आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य, तसेच वाघ, बिबटे व पशुपक्षीही बघता येणार आहेत. या मचाणीवर दुर्बिणीतून वन्यप्राणी नेमके कुठे आहेत, हेही बघता येणार आहे. या मचाणीशेजारीच ही सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे.
वेळप्रसंगी नास्ताही देण्याची व्यवस्था आहे. या ‘चाय पे चर्चा’साठी केवळ एक ते दीड तासांचा अवधी दिला जाणार आहे. वनमंत्री सुधाीर मुनगंटीवार व डॉ. जे.पी. गरड यांच्या हस्ते नुकतेच ‘चाय पे चर्चा’ प्रकल्पाचे लोकापर्यण झाले तेव्हापासून या मचाणीवरील ‘चाय पे चर्चा’ला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉ.जे.पी. गरड यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. पर्यटकांना आकारण्.ात येणारा निधी ग्राम परिसर विकास समितीच्या खात्यात जमा होणार आहे.
यातून गावाचा विकास केला जाणार असून गावकऱ्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.