माहिती तंत्रज्ञान युगात पोलिसांसमोर विविध आव्हाने निर्माण झाली असून या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रशिक्षणात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार पोलीस प्रशिक्षणादरम्यान नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी येथे दिली.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थीशी रविवारी डॉ. पाटील यांनी संवाद साधला. तसेच पोलीस आयुक्तालयातील आणि प्रबोधिनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. समाजाच्या संरक्षणाची काळजी घेत असताना सेवाभावना आणि समर्पण वृत्तीने कार्य केल्यास समाजाचा विश्वास सहजपणे संपादन करता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रशिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया असून पोलीस विभागात काम करताना बदलत्या परिस्थितीत सायबर गुन्हे, फॉरेन्सिक तंत्र, आर्थिक गुन्हे आदींचा अभ्यास अत्यावश्यक झाले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्णाांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घेताना कर्तव्यापालनासह जपवणूकही आवश्यक आहे. प्रशिक्षणा दरम्यान योग्य दिशा, शिस्त आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर चांगले कौशल्य आत्मसात करता येऊ शकते. प्रशिक्षणार्थीना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून येणाऱ्या सुचनांची दखल घेण्यात येईल, असे आश्वासनही डॉ. पाटील यांनी दिले.
यावेळी प्रबोधिनीचे संचालक नवल बजाज, सहसंचालक निरज वायंगणकर, उपसंचालक सुनील फुलारी, आदी उपस्थित होते.
नाशिकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नाशिक शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्यासाठी आपण आग्रही राहू, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. नाशिकचा वाढता विस्तार आणि पोलिसांचे कमी मनुष्यबळ, वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन नवीन सात पोलीस ठाण्यांची गरज आहे. त्यापैकी पाच ठाणी मंजूर करण्यात आली असून दोन ठाणीही लवकरच मंजूर होतील, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.