नारायण राणे यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त अद्यापि ठरलेला नाही, पण राज्याचा कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री भाजपात प्रवेश करीत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पक्षासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचा त्याग करण्यास तयार असल्याचे सूचक उद्गारदेखील त्यांनी काढले.

आंबोली, सावंतवाडी, कुडाळ ते खारेपाटण असा राज्य हायवेची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आले असता विश्रामगृहावर ते बोलत होते. राज्याचे बांधकाम सचिव आशीषकुमार सिंग, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे पाटील उपस्थित होते. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. नारायण राणे यांच्या कथित भाजपा प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपात प्रवेश करण्याबाबतच्या राणे यांच्या धोरणाबाबत मला काहीच कल्पना नाही, पण राज्याचा माजी मुख्यमंत्री भाजपात प्रवेश करीत असेल तर स्वागतच आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्तरावर नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत धोरण ठरेल. राणेंचा भाजपा प्रवेश आणि त्यांच्या अटींबाबत मला कल्पना नाही, असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खाते मला नको, असे पक्षाकडे स्पष्ट केले आहे. राणे भाजपात प्रवेश करतील आणि बांधकाम खाते त्यांना दिले तर माझी त्यावर कोणतीही तक्रार नसेल, पण भाजपाचे नेतृत्वच राणे यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.