कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी सहकार, पणन व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने भाजपला प्रथमच प्रतिनिधित्व मिळाले आहे. या निवडीमुळे भाजप-शिवसेनेसह महायुतीमध्ये जोरदार स्वागत केले जात आहे. तर विरोधी गोटातून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची मुख्य जबाबदारी नव्या पालकमंत्र्यांनी पेलावी असे म्हणत जिल्हा सर्वागसुंदर करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आज झाली आहे. करवीरनगरीतील चंद्रकांतदादा पाटील या भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाकडे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडून सलग दोन वेळा विजयी झालेले पाटील हे संघ परिवाराशी संबंधित म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे सहकार, पणन, बांधकाम, वस्त्रोद्योग अशी अनेक महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आता या जोडीलाच पाटील यांच्याकडे दोन जिल्ह्यांच्या विकासाचे पालकत्वही सोपवले आहे. या निर्णयाचे भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पाटील हे अनुभवी आणि युतीचे मार्गदर्शक असल्याने कोल्हापूरचे विकासाचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला आहे. महालक्ष्मी व जोतिबा तीर्थक्षेत्र विकास, टोल रद्द, रंकाळा संवर्धन, स्थलांतरित उद्योग रोखणे, रखडलेले सिंचन प्रकल्प आदी कामांसाठी ते प्रभावीपणे कार्यरत राहतील. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सर्वाना बरोबर घेऊन काम करतील असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे कार्यकत्रे राहुल चिकोडे यांनी पक्षाकडे प्रथमच पालकमंत्रिपदाची जबाबदारी आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्नांची चांगली जाण असल्याने प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटील प्रयत्नशील राहतील. ग्रामीण भागातून ते आले असल्याने ग्रामीण भागातील विकासाला निश्चितपणे चालना मिळेल.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविल्याच्या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोल्हापूरचा टोल रद्द करण्याच्या आंदोलनामध्ये चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार असल्याने त्यांनी ती जबाबदारी पेलावी. शहरातील व्यापा-यांना एलबीटीचा त्रास होत असून भाजपने तो रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले असल्याने त्याचे पालन पालकमंत्र्यांनी करावे. थेट पाइपलाइन योजना, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र यासह अपुरी कामे पूर्ण करून जिल्हा सर्वागसुंदर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न उपयोगी ठरतील. ज्याप्रमाणे आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी आणला त्याचप्रमाणे पाटील यांनीही तो आणावा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.