नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैदी फरार झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गडचिरोलीतील कारागृह याच आठवडय़ात सुरू करण्याचा मानस होता. मात्र, या घटनेमुळे व नक्षलग्रस्त भागातील या कारागृहात सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा प्रस्ताव सध्या तरी बारगळला आहे.
नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून काल, मंगळवारी पाच कैदी फरार झाले. या घटनेची दखल राज्याच्या गृह विभागाने अतिशय गांभीर्याने घेतली असून, राज्यातील सर्व कारागृहांना सतर्कतेचा इशारा देत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे निर्देश बघता चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात कालपासूनच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. चंद्रपूरचे कारागृह शहराच्या अगदी मध्यभागी आहे. या कारागृहाला चारही बाजूंनी मोठय़ा संरक्षण भिंती असल्या तरी कैदी पळून जाण्याच्या घटना या कारागृहातही घडलेल्या आहेत, तर नागपूरची घटना डोळ्यासमोर असतांना चारही बाजूंनी सुरक्षा रक्षक लावण्यात आले आहेत. या सोबतच कारागृहात कैद्यांना आत घेतांना त्यांची अंगझडती व सुरक्षेच्या दृष्टीने दररोज सकाळ व संध्याकाळ आढावा घेतला जात आहे. चंद्रपूर कारागृहाची क्षमता ३३३ कैद्यांची असून, सध्या ५४८ कैद्यांना ठेवण्यात आलेले आहे. क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्याने कारागृह व्यवस्थापनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, यातील १५० कैदी गडचिरोली जिल्ह्य़ातील असल्याची माहिती कारागृह अधिकारी गणेश महाले यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. तसेच चंद्रपूर कारागृहातील अट्टल गुन्हेगारांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
गडचिरोली येथे कारागृह बांधण्यात आलेले आहे. मात्र, नक्षलवादाची समस्या लक्षात घेता तेथील कारागृह अजूनपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे तेथील सर्व प्रकारचे कैदी चंद्रपूरच्या कारागृहात पाठविले जातात. त्यातही कुख्यात नक्षलवादी कैद्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात स्वतंत्रपणे, तर दलम सदस्य व किरकोळ नक्षलवादी कैदी चंद्रपुरातच ठेवण्यात येतात. त्यामुळेही चंद्रपूरच्या कारागृहातील कैद्यांची संख्या वाढलेली दिसत असल्याचे महाले यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रपूरच्या कारागृहावरील ताण कमी व्हावा म्हणून एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात गडचिरोली कारागृह सुरू करण्याचा गृहखात्याचा प्रस्ताव होता. मात्र, आता नागपुरातील घटनेनंतर हा प्रस्ताव बारगळला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, नांदेड येथील मध्यवर्ती कारागृह आज, १ एप्रिलला सुरू करण्यात येणार होते. त्या पाठोपाठ गडचिरोली सुरू केले जाणार होते. नांदेडचे कारागृह सुरू झाले. मात्र, गडचिरोलीचे कारागृह सुरक्षेचे कारण समोर करून सध्या तरी प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आलेला आहे.
गडचिरोली येथे एक प्रभारी कारागृह अधीक्षक, दोन जेलर, हवालदार व लिपीक,अशा दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. गडचिरोली हा नक्षलवादग्रस्त व अतिशय संवेदनशील जिल्हा आहे. तेथे कुठल्याही क्षणी नक्षल्यांची कुठलीही घटना, चकमक, भुसूरूंग स्फोट होऊ शकतो. या सर्व गोष्टीं लक्षात घेऊनच सध्या तरी गडचिरोली कारागृहाचा प्रस्ताव बारगळल्याची माहिती सूत्रांनी दिली.