चंद्रपूरचे नाव प्रदूषणात देशातील पहिल्या सहा जिल्ह्य़ामध्ये समाविष्ट करण्यात मुख्य भूमिका असलेल्या आणि प्रदूषणामुळे स्थानिकांना अनेक आजार, प्रसंगी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वेकोलिने ५६ कोटींचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) मध्यप्रदेशमध्ये हस्तांतरित करून खर्च केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विदर्भाचा मुख्यमंत्री, अर्थमंत्री व दोन केंद्रीय मंत्री असतांनाही वेकोलिने हा सीएसआर फंड वळता केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सीएसआर खर्च करण्याच्या मुद्यावर वेकोलि व्यवस्थापनाची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे. त्यामुळे अनेकदा वादही निर्माण झालेले आहेत. मात्र, आता तर महाराष्ट्रात ८६ पैकी वेकोलिच्या ५९ कोळसा खाणी या विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ात असतांना २०१४-१५ चा ५६ कोटींचा हा निधी मध्यप्रदेशात हस्तांतरित करून खर्चही केला. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार १५ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देतांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व शाळांमध्ये शौचालय निर्माणचे काम १५ ऑगस्ट २०१५ च्या पूर्वी करण्याची घोषणा केली होती. वेकोलिच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार कोल इंडियाला देशातील एकूण ५२ हजार शौचालय निर्माणाचे लक्ष्य देण्यात आले होते. याच अंतर्गत वेकोलिने मध्यप्रदेशात ४ हजार ४६२ शौचालयांचे बांधकाम केले. दरम्यान, वेकोलिच्या संकेतस्थळावर यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील १२ जिल्ह्य़ांमध्ये स्वच्छ विद्यालय अभियानांतर्गत २ हजार ३६० शासकीय शाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. वेकोलिच्या या आकडय़ानुसार मध्यप्रदेशातील बैतून जिल्ह्य़ात ३३९, बऱ्हानपूर ७७, छिंदवाडा २२, झाबुआ १५५, विदिशा ७८, रतलाम ३०३, धार ४१८, दमोह १८७, पन्ना ६९८, दतिया ६४, भिंड ११ व इंदौर येथे शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात वेकोलि चंद्रपूर क्षेत्राच्या महाप्रबंधकांना माहिती विचारली असता त्यांनी बोलणे टाळले. विशेष म्हणजे, या निधीचा ८० टक्के निधी तेथे खाण परिसरातील २५ किलोमीटरच्या क्षेत्रात खर्च करणे बंधनकारक असताना तो मध्यप्रदेशात खर्च केला गेला. नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ात वेकोलिच्या सर्वाधिक खाणी आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्तेनिर्माण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चार बडे नेते नागपूर व चंद्रपूर या दोन जिल्ह्य़ातून येतात. मात्र, या नेत्यांच्या देखत वेकोलिने ५६ कोटींचा निधी परस्पर मध्यप्रदेशात वळता केल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. आज या निधीतून तीन जिल्ह्य़ात अनेक विकासकामे झाली असती.