हवेतील प्रदूषणाच्या बाबतीत जगातील १६०० शहरांमध्ये चंद्रपूरचाही समावेश झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणी अहवालानुसार दिल्लीनंतर चंद्रपूरचा क्रम लागला आहे.  
देशातील चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर, अशी चंद्रपूरची ओळख आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सलग दोनदा केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे. या पाश्र्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनेही चंद्रपूरला प्रदूषित ठरवल्याने तेथील प्रदूषणाचे गांभिर्य वाढले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जगातील ९१ देशांमधील सर्वाधिक प्रदूषित शहरांची पाहणी केली. त्यातून १६०० शहरांची अंतिम निवड झाली. भारतातील १२३ शहरे सर्वाधिक प्रदूषित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भरपूर कोळसा खाणी, खासगी, तसेच सरकारी वीजनिर्मिती प्रकल्प, सिमेंटचे उद्योग यामुळे या भागातील औद्योगिकीकरणात वेगाने वाढ झाल्याने हे शहर प्रदूषित झाले आहे. सर्वाधिक प्रदूषणामुळेच हे शहर, तसेच आजूबाजूच्या परिसरात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गेल्या दोन वर्षांपासून उद्योगबंदी लागू केली आहे.