सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन खात्यातील समन्वयाअभावी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अडकून पडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी म्हणून तातडीने निर्णय घेत नसल्याने चंद्रपूरकरांना यावर्षी वैद्यक प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.
कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सुमारे पाच ते सहा वर्षांनंतर वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी प्रदान करण्यात आली. यासाठी बल्लारपूर बायपासवर २५ एकर जमीन मिळाली. अ.भा. वैद्यक परिषदेच्या तीन सदस्यीय समितीने दोनदा भेटी देऊन चंद्रपूर शहर, जागा व शहरातील काही शासकीय व खासगी इमारतींची पाहणी केली. चालू शैक्षणिक सत्रापासून वैद्यक महाविद्यालय सुरू करण्यासाठी एमसीआयच्या समितीने केवळ तीन त्रुटींची पूर्तता तातडीने करण्याचे निर्देश दिले. त्यात शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाची इमारत या महाविद्यालयासाठी हस्तांतरित करावी, प्रयोगशाळा आणि अधिष्ठाता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करून २ जुलैच्या आत अहवाल सादर करावा, असे म्हटले होते, परंतु सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग या राज्य शासनाच्या दोन खात्यांमध्येच समन्वय नसल्याने शासकीय वैद्यक महाविद्यालय अडकून पडले आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री कॉंग्रेसचे सुरेश शेट्टी आहेत, तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांनी एकत्र बसून स्वतंत्र महिला व बाल रुग्णालयाचा सामंजस्य करार करायला हवा. मात्र, राज्य शासनाच्या या दोन मंत्रालयात समन्वय नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच वैद्यक महाविद्यालयाच्या बैठका आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हायला हव्यात, परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व्देषापोटी शेट्टी यांना या बैठकांपासून दूर ठेवत असल्याची धक्कादायक माहिती आहे. या तीन त्रुटींची पूर्तता झाली तर १५ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करता येतात, परंतु मुख्यमंत्री स्वत: वैद्यक महाविद्यालय सुरू करण्याच्या मानसिकतेत नसल्याचा आरोप त्यांच्या पक्षाचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला आहे. त्याला कारण, मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी म्हणून चंद्रपूरकर जनतेच्या आरोग्याचा विचार न करता सुडबुध्दीचे राजकारण करून या सर्व परवानग्या अडवून ठेवल्या आहेत. कारण, पंचशताब्दीचा निधी तातडीने मिळावा व वैद्यक महाविद्यालय सुरू व्हावे म्हणून आपण बेमुदत उपोषण केले होते. तेव्हा दिल्लीतील कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी चव्हाण यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सर्व परवानग्या अडवून ठेवल्या आहेत. गेल्याच आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात बैठक घेतली, परंतु यातही त्यांनी हा सामंजस्य करार व्हावा, यासाठी साधा प्रयत्न सुध्दा केला नाही. याउलट, येथे महाविद्यालय येऊ नये म्हणून त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तिकडे राष्ट्रवादीनेही या महाविद्यालयासाठी प्रयत्न केलेले नाहीत. सार्वजनिक आरोग्य खाते व वैद्यक शिक्षण मंत्रालयासोबतच चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळेही या महाविद्यालयाच्या प्रश्नावर ढिम्म आहे. त्यांनी विचार केला तर अवघ्या चोवीस तासात या सर्व परवानग्या मिळवू शकतात, परंतु साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिकाच घेतली नाही. एकूणच वैद्यक महाविद्यालयासाठी परिस्थिती अनुकूल असतांना सुध्दा केवळ शासनाच्या दोन मंत्रालयात समन्वय नसल्याने वैद्यक महाविद्यालय अडकून पडले आहे.