कारणांचा शोध सुरू, दीड-दोन कोटींचे नुकसान
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागातील कोळसा वाहून नेणाऱ्या १०३ क्रमांकाच्या कन्व्हेअर बेल्टला आग लागल्याने वीज केंद्राचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर दोन तासाने आग विझविण्यात यश आले. दरम्यान, या आगीनंतरही वीज उत्पादनावर कुठलाही परिणाम झाला नसल्याची माहिती वीज केंद्र व्यवस्थापनाने दिली. आगीत दीड ते दोन कोटीचे आर्थिक नुकसान झाले.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास कन्व्हेंटर बेल्टच्या माध्यमातून कोळसा वाहून नेणे सुरू होते. याच दरम्यान कन्व्हेंअर बेल्ट क्रमांक १०३ ला अचानक आग लागली. या आगीने अल्पावधीत रौद्ररूप धारण केले. या आगीची माहिती वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे यांच्यासह अभियंत्यांना मिळताच सर्वानी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वीज केंद्राच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर तब्बल दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर १०.३० वाजताच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत कन्व्हेंअर बेल्ट १५० मीटर जळालेला होता. कन्व्हेअर बेल्टसोबतच या आगीत मोठय़ा प्रमाणात कोळसाही जळून राख झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, या आगीचे कारण कळू शकले नाही. यासंदर्भात अधिक माहितीसाठी वीज केंद्राचे मुख्य जनसंपर्क अधिकारी परचाके यांच्याशी संपर्क साधला असता, सकाळी आठच्या सुमारास कन्व्हेअर बेल्टला आग लागल्याची माहिती दिली. मात्र, आगीचे कारण कळू शकले नाही, असे ते म्हमआले.सध्या वीज केंद्र व्यवस्थापनाने आगीची चौकशी सुरू केली असून आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. या आगीत वीज केंद्राचे आर्थिक नुकसान झाले असले तरी त्याचा वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व संच नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असून अवघ्या काही तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमागे यात कुठला घातपात तर नाही ना, हे देखील बघितले जात आहे. तसेच या आगीत किमान दीड ते दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.